वसई: नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी येथे साई राज अपार्टमेंट येथे एक इमारत अचानक एका बाजूला कलंडली. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत यातून सत्तर हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही
नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी परिसर असून या भागात साई
राज अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या खालील बाजूस एका दुकानात दुरुस्तीचे काम सुरू होते. याचवेळी त्या दुकान दाराने मध्ये येत असलेल्या मुख्य कॉलम तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही इमारत एका बाजूला कलंडली. या घटनेमुळे राहिवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त कार्यालय सतर्क झाले. अग्निशमन दल, तांत्रिक पथक, तसेच सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेच्या पथकाने तात्काळ मदत व बचावकार्य सुरू करत इमारतीतील सुमारे ७० पेक्षा अधिक रहिवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या नागरिकांना जवळील सभागृहात तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या घटनेची भाजपच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांनी पाहणी करून वेळोवेळी महापालिकेने धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींची तपासणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जुलै २०२३ मध्ये नालासोपारा हनुमाननगर भागात असलेल्या जैनम या अतिधोकादायक इमारत कलंडली होती. तेव्हा पालिकेने ५० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले होते.
वसई विरार महापालिकेने तेथील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून इमारत खाली केली आहे. आता पालिकेकडून पुन्हा एकदा या इमारतीचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. : अश्विनी मोरे, सहायक आयुक्त (ई प्रभाग) वसई विरार महापालिका