वसई: वसई विरार शहरात मागील काही वर्षात इमारत (टॉवर) संस्कृती मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. हळूहळू आता हरित पट्ट्यात ही बांधकाम प्रकल्प उभारण्यास सुरुवात होऊ लागली आहे. त्यामुळे येथील हरित पट्टा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात. याच निषेधार्थ रविवारी वसईच्या मुळगाव येथे चौक सभा घेत या टॉवर संस्कृतीला कडाडून विरोध केला आहे.
वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. शहरात विविध ठिकाणी मोठं मोठे बांधकाम प्रकल्प ही उभे राहत आहेत. हळूहळू हे प्रकल्प वसई विरार शहराच्या हरित पट्ट्याकडे सुद्धा वळू लागले आहे. त्यामुळे येथील हरित पट्टा धोक्यात सापडू लागला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गावात नागरिक राहत आहेत त्यांना प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरविल्या नाहीत असे असताना आता सर्रास पणे विकासकांना बांधकाम परवानग्या देऊन काँक्रिटची जंगल उभे केले जात आहे. या काँक्रिटच्या जंगलामुळे वसई पश्चिमेच्या भागातील हरित पट्टा नष्ट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच निषेधार्थ वसई पश्चिमेच्या मुळगाव येथे रविवारी ‘निर्धार चौक’ सभा पार पडली. यात मोठ्या संख्येने वसईकर नागरिक सहभागी झाले होते.
गावात अजूनही पिण्याचे शुद्ध पाणी, गटारांची व्यवस्था, चालायला दोन्ही बाजूला फुटपाथ, सांडपाणी प्रकल्प, यासह इतर प्राथमिक सोयीसुविधा नाहीत अशा स्थितीत येथील नागरिकांना राहावे लागत असताना असे प्रकल्प आणले जात आहेत. जो पर्यंत सुविधा मिळत नाहीत तो पर्यंत गावात इमारती उभारण्यात परवानगी देऊ नये अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. जर अशा प्रकारे परवानग्या दिल्या गेल्यास त्याला संपूर्ण गावकरी एकत्र येऊन त्याला विरोध केला जाईल असा इशारा ही सभेच्या दरम्यान नागरिकांनी दिला आहे.
हरित पट्टा टिकविण्यासाठी प्रयत्न
वसईच्या पश्चिमेच्या हरित पट्ट्याच्या भागात चटई निर्देशांक १ केला आहे. त्यामुळे हळूहळू हरितपट्ट्यात टॉवर संस्कृतीचा उगम झालेला आहे. कोणत्याही पायाभूत सुविधा गटारे, सुरक्षित चालण्यासाठी फुटपाथ, सिव्हेज प्लांट, पिण्याचे शुद्ध पाणी, परिवहन व्यवस्था नसताना गावात जागोजागी उभे राहणारे टॉवर त्यामुळे वाढणारी लोकसंख्या वाहनांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न अतिशय गंभीर आहेत असे मी वसईकर अभियानाचे मिलिंद खानोलकर यांनी सांगितले आहे. हा हरित पट्टा शाबूत राहावा यासाठी आमच्या वसईच्या भूमीपुत्रांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.