वसई: वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यावर उपाययोजना म्हणून पालिकेकडून अतिखड्ड्यांची ठिकाणे निश्चित करून त्याचे काँक्रिटिकरण केले जाणार होते. मात्र त्या खड्ड्यांच्या काँक्रिटिकरणाचे काम रखडले आहे.

वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १ हजार १६ किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केलेले रस्ते आहेत. दरवर्षी पावसाळ्यात शहरात सरासरी २२२५ मिमी ते २२५० मिमी पाऊस पडतो. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य तयार होते. याच वाहनचालकांना मोठा फटका बसतो.

खड्ड्यामुळे वाहतूकीचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तर काही वेळा अपघातासारख्या घटना घडतात. याशिवाय विविध ठिकाणी पाणी साचत असल्याने डांबरीकरण केलेले रस्ते फुटून जातात. या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च कोट्यावधी रुपयांच्या घरात जातो. यासाठी पुढील दहा ते बारा वर्षे रस्ते चांगले टिकतील असा विचार करून शहरातील अतिखड्ड्यांच्या ठिकाणांचा शोध घेतला होता. या सर्वेक्षणासाठी मे सबडक्शन झोन कन्सल्टंट यांची नियुक्ती करून नकाशे, अंदाजपत्रक, आराखडे तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यात पहिल्या नऊ प्रभागात पालिकेने ५१ रस्त्यांची ठिकाणे निश्चित केली आहेत. यात एकूण १८ हजार ७३९ लांबीचे व ५०८ मीटर रुंदीचे असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ९४ हजार ३८२ चौरस मीटर इतके आहे. यासाठी २०८ कोटी ७२ लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र अजूनही या रस्त्याच्या कामांना सुरवात न झाल्याने अतिखड्ड्यांचे रस्ते रखडले आहेत.

या रस्त्यांच्या कामाचे नियोजन करण्याचे काम सुरू असून लवकर पुढील कामाची प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात केली जाईल असे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

काँक्रिटीकरणासाठी स्वतंत्र १५० कोटींचे नियोजन

पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या ही सर्वाधिक निर्माण होते.यासाठी ते खड्डे कमी करता यावे व दुरुस्तीवर होणार खर्च कमी करण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. २०२५-२६ या अर्थसंकल्पात काँक्रीटकरणाच्या कामासाठी १५० कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. एकूणच आता निश्चित केलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरणासाठी २०८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. परंतु पहिल्या टप्प्यात १५० कोटींचे नियोजन केले आहे.

गुणवत्तापूर्ण काम न केल्याने रस्त्यांची बिकट अवस्था

वसई विरार महापालिका शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती करताना गुणवत्ता पूर्ण काम करीत नसल्याने रस्त्यांची बिकट अवस्था होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषतः कामामध्ये टक्केवारीचे गणित असल्याने या रस्त्यांची कामे योग्य होत नाहीत त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो असे सामाजिक कार्यकर्ते मनवेल तुस्कानो यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.