विरार : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने चांगली सुरुवात केल्याने वसईत भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर जून महिन्यात शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केली होती. अवघ्या काही दिवसातच या भाताची रोपे चांगल्या प्रकारे तयार झाल्याने ती खणून भात लागवडीच्या (आवणी) कामाची सुरुवात केल्याचे चित्र दिसून आले आहे. आतापर्यंत २८०० हेक्टर जागेत भाताची लागवड करण्यात आली आहे.
वसईच्या ग्रामीण भागासह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड केली जाते. विशेष करून वसई पूर्वेच्या अनेक गावांमध्ये भात पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून पावसाची अनियमितता आणि अतिवृष्टी यामुळे भात शेतीवर परिणाम होत असतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागतो. तसेच खतांचे आणि मजुरांचे वाढलेले दर यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा पावसाची सुरुवात चांगली झाल्याने आता भात लावणीची कामे अंतिम टप्य्यात आल्याने शेतकरी वर्ग आनंदात असल्याचे पाहायला मिळते. वसईत तालुक्यात एकूण ७ हजार हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. त्यापैकी २ हजार ८०० हेक्टरवर आत्तापर्यंत ३९ टक्के भात लागवड पूर्ण झाली आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
मनुष्यबळाची कमतरता
भात शेतीच्या कामांसाठी आणि जमिनीची मशागत तसेच भाताची लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता भासते. यासाठी मजुरांना प्रतिदिन ५०० ते ६०० रुपये मजुरी दिली जाते. मात्र मजुरी करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने याचा फटका भात शेतीला बसताना दिसत आहे.