वसई:- वसई विरार महापालिकेकडून स्मशानभूमीत बाल उद्यान तयार करीत खेळण्याचे साहित्य बसविले होते. या प्रकारचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. त्यानंतर पालिकेने या खेळाचे साहित्य काढून टाकले आहे.
वसई पश्चिमेच्या प्रभाग समिती ‘आय’ (वसई गाव) अंतर्गत असलेल्या बेणापट्टी भागात एक हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे. पालिकेने या स्मशानभूमीची दुरवस्था दूर करण्याऐवजी चक्क या स्मशानातच खेळण्याचे आणि मनोरंजनाचे साहित्य लावले होते. यात वेगवेगळ्या प्रकारची १५ हून अधिक साहित्य लावण्यात आली होती. त्यात झोपाळा, घसरगुंडी आदी साहित्यांचा समावेश होता. स्मशानभूमीत लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य लावल्याने नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जात होता. पालिकेच्या या अजब प्रकाराबाबत दैनिक लोकसत्तान २५ जुलै २०२५ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.


या वृत्ताचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नागरिकांबरोबर सर्वच राजकीय पक्षांनी या बेजबाबदार कृतीचा निषेध केला आहे. स्मशानभूमी ही दुःखाची जागा आहे.असे असताना त्या ठिकाणी मनोरंजनात्मक साहित्य लावणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. तर पालिकेने अशा प्रकारचे कृत्य करणे म्हणजे नागरिकांच्या भावनांशी खेळ आहे. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष ही आक्रमक होत पालिकेला चांगलेच धारेवर धरले होते. अखेर पालिकेने केलेली चुकी कबूल करीत स्मशानभूमीत लावण्यात आलेले साहित्य काढून टाकण्यात आले आहे.