वसई: अभयारण्यात असलेल्या प्राण्यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी रात्री बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाकडून प्राणीगणना केली जाणार आहे. तुंगारेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या ठिकाणी माचीवर टेहळणी करून प्राणी गणना करण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे.

वसई पूर्वेच्या भागात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागूनच तुंगारेश्वर अभयारण्य आहे. हे अभयारण्य आठ  हजाराहून अधिक हेक्टर या वनपरिक्षेत्रात हे अभयारण्य विस्तारलेले आहे.  या अभयारण्यात विविध पशु प्राण्यांचा वावर आहे. परंतु मागील काही वर्षात अभयारण्यात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे अभयारण्यात वर्षभरात वन्यप्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली, मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या संख्येवर कोणता परिणामा झाला आहे. का? हे जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने प्राण्यांची गणना केली जाते. यंदाच्या वर्षी सुद्धा बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे.

१२ मे सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १३ मे मंगळवारी पहाटे पर्यंत ही गणना केली जाणार आहे. यात पेल्हार धरण, पारोळ येथील खोकर नाला, तुंगारेश्वर रामकुंड,जूचंद्र पाझरतलाव, चिंचोटी धबधबा, चिंचोटी दहीहंडी, कामण अशा सात पाणवठ्याच्या ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लाकडी मचाण (माची) तयार करण्यात आली आहे. त्यावर शांत पणे थांबून टेहळणी केली जाणार आहे.वनकर्मचारी व प्राणीप्रेमी यांच्या मार्फत सोमवारी संध्याकाळपासून ते मंगळवारी सकाळ पर्यंत पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांवर लक्ष ठेवून त्याच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी ३ वन कर्मचारी व प्राणी प्रेमीं असणार आहेत यंदा आठ प्राणी प्रेमींनी आतापर्यंत नोंद केली आहे या प्राणीगणनेमुळे अभयारण्यात असणाऱ्या प्राण्याची अंदाजित माहिती यासह एखादा नवीन कोणता प्राणी आला आहे याची माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना केली जाणार आहे. त्यासाठी मचाण व्यवस्था तयार केली आहे. तसेच सहभागी होणारे वन कर्मचारी व प्राणी प्रेमीं यांना सूचना केल्या आहेत – राजश्री साळवे, तुंगारेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी.

लख्ख प्रकाशामुळे बुद्धपौर्णिमेला प्राणीगणना

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक लख्ख प्रकाश असतो त्यामुळे याच दिवशी प्राणीगणना केली जाते.बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच ठशांचा अभ्यास करून वन्यप्राण्यांची गणना केली जाते. विशेषतः ही गणना पारंपारिक पद्धतीने केली जात असल्याने पारपंरिक वन्यप्राणी गणनेविषयी प्राणीप्रेमींना खूप आकर्षण आहे. यातून मिळणारी वन्यप्राण्यांची आकडेवारी अचूक नसली, तरी नव्याने दाखल झालेले वन्यप्राणी अथवा कमी झालेल्या एखाद्या प्राण्याविषयी मिळालेली माहिती अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते.