वसई : वसईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. चार दिवसांनंतरही पावसाचे पाणी ओसरले नसल्यामुळे विविध ठिकाणी साप आढळून येत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. सर्पमित्रांकडून या सापांना पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वसई शहरात कोसळलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाऊस ओसरल्यानंतरही अजूनही वसईतील सखल भागातील गृहसंकुले, कार्यालयांतील पाणी ओसरले नसल्याचे दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात असणारे साप नागरिकांच्या घरात, कार्यालयात शिरत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या होत्या. तसेच नागरी वस्तीत सातत्याने विषारी साप आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वसईतील भुईगाव परिसरात चार नाग, गिरीज येथे एक घोणस, तसेच पारनाका परिसरातून एक घोणस आणि चार विविध प्रकारचे साप असे वेगवेगळ्या प्रजातीचे विषारी साप पकडले असल्याची माहिती सर्पमित्र हेमंत पवार यांनी दिली. यावेळी साचलेल्या पाण्यात सापांपेक्षा सापांची पिल्ल मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात सर्पदंशापासून वाचण्यासाठी साचलेल्या पाण्यातून चालताना गमबुटांचा वापर करावा. तसेच घराशेजारी पाणी साचू देऊ नये. शेतात काम करताना गमबुट, हातमोजे वापरावेत. वाहन वापरण्याआधी ती तपासून पाहावीत कारण वाहनांमध्ये साप लपून बसले असण्याची शक्यता असते.