वसई:- वसई पश्चिमेच्या कळंब समुद्र किनारी एक मोठा कंटेनर आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी प्रभात फेरीसाठी गेलेल्या नागरिकांना हा कंटनेर दिसून आल्याने हा प्रकार उघड झाला आहे.पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
वसई पश्चिमेच्या भागात कळंब समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा कंटनेर वाहून आल्याचे नागरिकांना दिसून आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती तात्काळ नालासोपारा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
या कंटनेर पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली आहे. हा कंटेंनर एखाद्या मालवाहतूक करणाऱ्या जहाजातून पडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.