विरार : वसई तालुक्याला विविध ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. यातीलच एक वास्तू असणाऱ्या वसईच्या माणिकपूर गावातील ऐतिहासिक संत मायकल चर्चचे नुकताच नूतनीकरण करण्यात आले आहे. ४१९ वर्षाचा इतिहास लाभलेल्या या पुरातन चर्चचे नूतनीकरण झाल्याने माणिकपूर वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या चर्चला आता पांढऱ्या शुभ्र रंगाची झळाळी प्राप्त झाली आहे.

वसईच्या पश्चिमेला माणिकपूर गावात ऐतिहासिक संत मायकल चर्च आहे. पोर्तुगीज काळात १६०६ साली माणिकपूर येथे छोटेखानी ख्रिस्तमंदिर उभारण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी चर्चच्या वास्तूत नवी भर पडत गेली. सध्या अस्तित्वात असलेल्या चर्चच्या वास्तूचे बांधकाम १८५१ साली पूर्ण करण्यात आले. नुकताच करण्यात आलेल्या नूतनीकरणात चर्चच्या मूळ वास्तूकलेला अजिबात धक्का न लावता नवे बदल करण्यात आले आहेत. यामुळे नूतनीकरणासोबतच वास्तू संवर्धनाचे महत्वाचे कामही चर्चकडून करण्यात आले आहे.

चर्चचा मुख्य मनोरा उंच असून या मनोऱ्याखाली मुख्य वेदीवर संत मायकल यांची रेखीव पुरातन मूर्ती आहे. या मनोऱ्यापुढे असणाऱ्या सभागृहातील लाकडी पुरातन दरवाजांनाही नवी झळाळी देण्यात आली आहे. तसेच सभागृहाच्या छतावर ‘पवित्र त्रैक्य’ चित्र नव्याने चितारण्यात आले असून यामुळे चर्चच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसेच छतावर वैशिष्ट्यपूर्ण पंखे लावण्यात आले आहेत. चर्चचे प्रमुख धर्मगुरु आसिस रॉड्रिग्ज यांच्या पुढाकाराने आणि माणिकपूर वासियांनी दिलेल्या देणगीतून नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.

दीडशे वर्ष जुन्या ‘क्रुसाची वाट’ शिल्पकृतीचे संवर्धन

चर्चमध्ये असणाऱ्या दीडशेहून अधिक वर्षे जुन्या ‘क्रुसाची वाट ‘ या शिल्पकृतींचे संवर्धन करण्यात आले आहे. यात येशू ख्रिस्ताच्या अखेरच्या दिवसातील १४ दुःखद प्रसंग शिल्पकृतींच्या माध्यमातून रेखाटण्यात आल्या आहेत. या जुन्या शिल्पकृतींचे प्रथमच संवर्धन करण्यात आले असून चर्चमधील भिंतीवर या शिल्पकृती मूळ जागी लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पुरातन शिल्पकृती ‘थ्री डी’ स्वरूपाच्या आहेत. यामुळे ‘क्रुसाची वाट’ त्याच्या मूळ रूपात पाहता येणार आहेत. अशी माहिती लेखक मायकल लोपीस यांनी दिली.

चर्चमध्ये दानाची अनोखी परंपरा

चर्चचे नूतनीकरण करण्याचे ठरविल्यानंतर माणिकपूर गावातील ख्रिस्ती भाविकांनी चर्चकडे निधी सुपूर्द केला. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे इथे देणगीदारांच्या नावाची कोनशीलाही लावण्यात येत नाही किंवा यादीचे वाचन करण्यात येत नाही. त्यामुळे ख्रिस्ती भाविक देणगी देताना आपले नाव येणार नाही याची काळजी घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून दानाची ही परंपरा सुरु असल्याची माहिती चर्चचे प्रमुख धर्मगुरु आसिस रॉड्रिग्ज यांनी दिली.