वसई : वसई विरार शहर हागणदारी मुक्त व्हावे यासाठी पालिकेकडून शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र त्या शौचालयांची अवस्था फारच बिकट झाली असल्याने महिलांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेचा शहर हागणदारी मुक्तीचा दावा फोल ठरला असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.

‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने मागील काही वर्षात विविध सार्वजनिक ठिकाणी शौचालये उभारली आहे. विशेषतः झोपडपट्टी, दाट लोकवस्ती, सार्वजनिक ठिकाणी हजारो शौचालये बांधली पण ही शौचालये सध्या देखभालीविना या शौचालयांची दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. उघड्यावर शौचास गेल्याने त्यातून संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असल्याने शहरात शौचालयांची निर्मिती करण्यात आली होती.

याबाबत स्वच्छता भारत अभियानाच्या अंतर्गत शहर हागणदारी मुक्त राहावे यासाठी पालिकेने जनजागृती मोहिमा घेत नागरिकांना उघड्यावर शौचास बसू नका असे आवाहन केले होते. या स्वच्छतेबाबत २०१८ मध्ये पालिकेला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार ही मिळाला होता. मात्र त्यानंतर पालिकेचे स्वच्छता व शौचालये याकडे दुर्लक्ष झाल्याने अवस्था फारच बिकट बनली आहे. काही ठिकाणी दरवाजे तुटलेले, बसण्याचे भाडे अस्वच्छ, कचऱ्याचे साम्राज्य, वीज पाण्याच्या सुविधेचा अभाव अशा अडचणी येत आहेत.

वसईच्या भोयदापाडा स्मशानभूमी जवळ महिलांसाठी शौचालये तयार केली होती. मात्र मागील चार वर्षांपासून ती नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे येथील महिलांना रात्रीच्या वेळी उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. सार्वजनिक शौचालयांची भीषण अवस्था पाहिली की त्यापेक्षा उघडय़ावर शौचास बसणे हे या रहिवाशांसाठी जास्त आरोग्यदायी आहे, असे म्हणायची वेळ येते असेही येथील नागरिकांनी सांगितले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही पालिकेने त्याकडे लक्ष दिले जात नाही असे शिवसेना (ठाकरे गट) वसई तालुका प्रमुख काकासाहेब मोटे यांनी सांगितले आहे.

पालिका शहरात स्वच्छतेचा नारा देते मात्र प्रत्यक्षात स्वच्छता राखण्याच्या उपाययोजनांकडे पाठ फिरवते असेही त्यांनी सांगितले आहे. हे केवळ याच भागात नाही तर शहरातील अनेक भागात अशीच स्थिती आहे. यासाठी पालिकेने शौचालयांची पाहणी करून त्यांची दुरुस्ती करावी व आवश्यक ठिकाणी नवीन शौचालये उभारावी अशी मागणी मोटे यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३१६ ठिकाणी दुरुस्ती करणार

वसई विरार शहरात शौचालयांची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी नंतर पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात शौचालयांची पाहणी करण्यात आली होती. यात शहरातील ३१६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी दुरुस्तीची गरज असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी १२ कोटी २२ लाख रुपये इतका निधीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आली आहे.

शहरातील शौचालयांची स्वच्छता निरीक्षक यांना सांगून पाहणी करण्यात येत आहे. जिथे दुरवस्था झाली असेल त्यांची दुरुस्ती केली जाईल. याशिवाय नवीन शौचालय आवश्यक असतील त्यांचे ही नियोजन केले जाईल. – अर्चना दिवे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)