वसई: पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून धोकादायक असलेल्या वृक्षांची छाटणी केली जाते. मात्र ही छाटणी करताना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात नाही. यामुळे छाटणी दरम्यान झाडांची फांदी अंगावर कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.
वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुनी झालेले वृक्ष आहेत. पावसाळ्याच्या दिवसात झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडून अपघात होऊ नये यासाठी पालिकेकडून ठेकेदाराच्या माध्यमातून झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या दरम्यान कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने उलट अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
नुकताच विरार पश्चिमेच्या पुष्पानगर येथील मुख्य रस्त्यालगत एका मोठया वृक्ष छाटणीचे काम पालिकेकडून करण्यात येत होते. त्यावेळी सुद्धा नागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे बॅरिगेट लावले नव्हते. नागरिकांची रस्त्यावरून वर्दळ सुरू असतानाही ही छाटणी सुरूच असल्याचे चित्र दिसून आले.अशा वेळी जर झाडाची एखादी फांदी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पडल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.पालिका अशा निष्काळजीपणे जर वृक्ष छाटणीची कामे करीत असेल तर ते अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. वृक्ष छाटणी करताना पालिकेने योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
कर्मचारी ठेकेदारांना उपायुक्तांच्या सूचना
वसई विरार शहरात वृक्ष छाटणी करताना योग्य ती काळजी घेतली जात नसल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली. यापुढे वृक्ष छाटणी करताना आवश्यक बॅरिगेटिंग व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना कर्मचारी व संबंधित ठेकेदारांना दिल्या जातील असेमहापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी सांगितले आहे.