लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई – वसईच्या चिमाजी अप्पा मैदानाजवळ असलेल्या नाल्यावरील खाऊ गल्लीवर अद्याप पालिकेने कारवाई केली नाही. हा नाला धोकादायक बनला असून कुठल्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत दोनदा स्मरणपत्र देऊनही या पालिकेने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानाशेजारील मोठा नाला आहे. वसई-विरार महापालिकेने या नाल्यावर स्लॅब टाकला होता. त्यावर विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थाच्या गाड्या लावल्या आहेत. सध्या येथे ८० हून अधिक विविध खाद्यपदार्थ्यांच्या गाड्या आहेत. या मैदानात विविध कार्यक्रम होत असतात शिवाय जवळच महाविद्यालय आहे. त्यामुळे येथे नागरिकांची मोठी गर्दी होत असते. हा नाला परिसर खाऊ गल्ली म्हणून प्रसिध्द झाला आहे.

मात्र रसार्वजनिक बांधकाम विभागाने या नाल्याचे संरचनात्कम लेखापरिक्षण (‘स्ट्रक्चरल ऑडिट`) केल्यानंतर हा स्लॅब अत्यंत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. हा स्लॅब अतिरिक्त भार घेऊ शकत नसल्याने वाढत्या भारामुळे स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाल्यावरील हातगाड्या हटविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजार विभागास पत्र दिलेले आहे. या अनधिकृत गाड्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रभाग समिती ‘आय’ने केवळ फलक लावून सामान्य नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिलेला आहे. बाजार विभाग व अतिक्रमण विभागाच्या पत्राची दखलच घेतलेली नाही.

दुर्घटना घडण्याची शक्यता, कारवाईची मागणी

या नाल्याची रचना ‘सेल्फ लोड` विचारात घेऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे नाल्याचा स्लॅब अतिरिक्त भार घेऊ शकणार नाही. अतिरिक्त भारामुळे स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार विभाग व अतिक्रमण विभागाने या नाल्यावरील अनधिकृत खाऊगल्ली तात्काळ हटवावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या आहेत. याबाबत दोनदा स्मरणपत्र देऊनही या दोन्ही विभागांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) पालघर जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही बाजार विभागाचे अधिकारी कारवाई करत नसतील तर यात नक्कीच यात आर्थिक भ्रष्टाचार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. बाजार विभागाचे अधिकारी या गाड्या हटवत नसतील आणि भविष्यात यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रभाग समिती ‘आय`चे सहाय्यक आयुक्त व कर अधीक्षकांची असेल असे त्यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या हातगाड्यांवर कारवाई करण्यात येईलृ, असे प्रभाग समिती आय चे बाजार विभाग अधीक्षक राजीव पाटील यांनी सांगितले.