वसई विरार शहरात राविवारी वादळी वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील एका निवासी संकुलात असलेले वडाचे झाड वाहनावर कोसळल्याची घटना घडली आहे. यावेळी आसपास कोणीही नसल्याने या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वसई विरार शहरात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून रविवारीही पावसाचा जोर कायम होता. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यांवर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. यावेळी पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तातडीने रस्त्यातील झाडे हटविण्यात आली. यामुळे काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम होऊन नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या नागोला तलाव परिसरातील साईकृपा निवासी संकुलात असणारे एक वडाचे झाड वॅगनार वाहनावर कोसळले. सुदैवाने यावेळी आसपास कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संपूर्ण झाड वाहनावर कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

रहिवाश्यांनी ही माहिती वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागला दिल्यांनतर तात्काळ अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी कटर मशीन आणि कुऱ्हाडीच्या साह्यायाने झाड कापून नुकसान झालेले वाहन बाजूला केले आहे. दरम्यान शहरात पावसाचा जोर कायम असून बाहेर पडताना, आपली वाहने पार्क करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.