वसई: वसई पश्चिमेच्या कळंब खाडी जवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बालिका प्लास्टिक पिशवीत भरून टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना उघड झाली. या बालिकेला पोलिसांनी पालिकेच्या विरारच्या बोळींज रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले असून बालिका सुखरुप स्थितीत आहे.
वसई पश्चिमेच्या भागात कळंब परिसर आहे. येथील कळंब गावात जाणाऱ्या खाडी पुलाजवळ रस्त्यालगत दुपारी एक व्यक्ती लघुशंका करण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत नवजात बालिका रडत असल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीने तातडीने पोलिसांच्या ११२ क्रमांकावर दूरध्वनी करून या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून नवजात बालिका ताब्यात घेतले व वसई विरार महापालिकेच्या बोळींज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सापडलेले बालिका एक ते दीड महिन्याचे असून ते सुखरूप आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या प्रकाराचा तपास सुरू केला असून या बालिकेच्या आई वडिलांचा शोध आम्ही घेत आहोत असे पोलिसांनी सांगितले आहे.