वसई : एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा; दोन जणांचा मृत्यू , तीन जणांवर उपचार सुरू

नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून हे कुटुंब झोपी गेले होते, त्यानंतर मुलांना त्रास सुरू झाला

वसई : एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा; दोन जणांचा मृत्यू , तीन जणांवर उपचार सुरू

विरार जवळील कण्हेर भोयेपाडा येथील एकाच कुटुंबातील पाच मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांवर पालिकेच्या नालासोपारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वसई पूर्वेतील महामार्गावरील  विरार फाटा येथील कण्हेर भोयेपाडा येथे मोहम्मद अशफाक खान हे पत्नी व पाच मुलांसह राहत आहे. ते रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून हे कुटुंब झोपी गेले होते.

मध्यरात्रीनंतर  दोन मुलांना उलट्या सुरू झाल्या. मात्र एवढ्या रात्री दवाखान्यात जाण्यापेक्षा पहाटे लवकर जाऊ असा विचार करून पालकांनी उलट्या करणाऱ्या मुलांवर घरगुती तात्पुरता उपचार केला होता. तरीही काही फरक पडत नसल्याने त्यांनी भल्या पहाटे मुलांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मुलगा व मुलगी या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. असिफ खान(९), फरीफ खान (८) अशी त्यांची नावे आहेत. तर फराना खान (१०) आरिफ खान(४), साहिल खान(३) या तीन जणांना पालिकेच्या नालासोपारा येथील तुळींज रुग्णालयात दाखल केले आहे . त्यांची प्रकृती ठीक असली तरी  त्यांना देखरेखीखाली ठेवले आहे. यात आई-वडील मोहम्मद अशफाक खान रझिया अश्फाक खान यांच्यासह तीन मुलांमध्ये विषबाधेची कोणतीही लक्षणे दिसून आली नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले –

याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच या जेवणाचे नमुने ही अन्न औषध तपासणी विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर शवविच्छेदन अहवाल ही मागविण्यात आला असल्याचे माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पुढील अधिकचा तपास ही करीत असल्याचे वाघ यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasai poisoning of five children of the same family two people died three children are undergoing treatment msr

Next Story
नावांच्या कोंडीत नायगाव उड्डाणपूल ; रविवारी शिवसेनेतर्फे जाहीर नामकरणाचा कार्यक्रम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी