वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बाभोळा परिसरात नालेसफाईचे काम अपूर्ण राहिल्याने स्थानिक नागरिकांना सध्या चिखल, दुर्गंधी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, नालेसफाईसाठी वापरलेली पोकलेन मशीन ही दोन आठवड्यांपासून नाल्यातच पडलेली असून ती अद्याप हलवण्यात आलेली नाही.
मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे महापालिकेची नालेसफाई अर्धवट राहिली होती. यानंतर जूनमध्ये कामे पुन्हा सुरू झाली; मात्र सततच्या पावसामुळे ती थांबवावी लागली. बाभोळा परिसरातील वेस्टर्न इन हॉटेलसमोरील नाल्यात अडकलेली पोकलेन आणि काढून रस्त्याकडेला टाकलेला गाळ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाच्या पाण्याबरोबर गाळ रस्त्यावर वाहून आल्यामुळे चिखल साचला असून रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर गाळामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. पोकलेन बाहेर काढून गाळ हटवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
कांदळवन अडथळे
वसई विरार महापालिकेकडून बाभोळा येथील नाल्याची स्वच्छता केली आहे. दत्तानी मॉलच्या समोरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी चर ही मारले असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.याशिवाय पूर्ण नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी त्या ठिकाणी कांदळवन क्षेत्र आहे त्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता करण्यास अडथळे निर्माण होत आहेत असे महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले आहे.