वसई: सध्या देशभरात जर कोणती गोष्ट चर्चेचा विषय ठरत असेल तर तो विषय म्हणजे निवडणूका. महाराष्ट्रात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे सर्वांच्या नजरा जर कशाकडे लागून राहिल्या असतील तर तो म्हणजे बिहार निवडणुकीचा निकाल. ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तर येत्या १४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये करण्यात आलेले प्रचार-प्रसार, निधीची लयलूट आणि योजनांच्या माध्यमातून देण्यात आलेली आश्वासने यामुळे एनडीए, महागठबंधन, आणि जनसुराज पक्षात चुरशीची लढत पाहण्यास मिळाली आहे. मूळ निकालाआधी विविध वाहिन्यांनी जाहीर केलेल्या संभाव्य निकालांमुळे (Exit Poll) नेतेमंडळींपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वचजण निकलाबाबतीत विविध तर्कवितर्क लावत आहेत.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व आणि बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल या विषयावर आधारित अशीच काहीशी चर्चा वसईच्या रिक्षात रंगल्याची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. वसई न्यायालय ते वसई रेल्वे स्थानक असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने ही चित्रफीत आपल्या मोबाईलमध्ये टिपली आहे. या चित्रफितीत प्रवासी सांगताना दिसतोय कि, वसईत प्रवास करताना मला पांडे नावाचे रिक्षाचालक भेटले. ते स्वतःला वसई विरार महापालिका निवडणुकीसाठीचा उमेदवार म्हणत असून मोदी आणि योगींच्या कार्यकाळाचे खूप कौतुक केले आहे.

त्या पुढे चित्रफितीत रिक्षाचालक बोलताना दिसून येत आहे. बँकांच्या बाहेर रांगा, एटीममधून पैसे काढण्यासाठी रांगा पण आता बघा साधा वडापाव खाल्ला तरी ऑनलाईन पेमेंट करता येतं. हा आहे आधुनिक भारत. त्यामुळे मोदी आणि योगी असले पाहिजेत.

पुढे याच चित्रफितीत प्रवासी चालकाला तुम्हाला बिहार निकवडणुकीबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. याबाबत बोलताना, एपीआय (NDA) येणार अजून कोण येणार? चोर निवडून येणार का? चारा घोटाळा करणारे. प्रत्येक मुलाचं काहीतरी स्वप्न असतं. असं नाहीये कि, फक्त माझ्या कुटूंबातले, नात्यागोत्यातले लोक सत्तेत बसतील. इतरांना पण संधी द्या, अशा शब्दात रिक्षाचालकाने संताप व्यक्त केला आहे. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाच्या कार्यक्षमतेवर देखील त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या चित्रफितीमुळे बिहारच्या निकालाबाबत वसईतील सामान्य नागरिकांमध्येही उत्सुकता आणि तीव्र राजकीय मतमतांतरे असल्याचे दिसून आले आहे.