वसई: पारंपरिक पद्धतीने घरोघरी जाऊन शासकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामीण भागात केल्या जाणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणाला आता सफाई ॲपची जोड मिळणार आहे. सर्वेक्षणातून गोळा करण्यात आलेली माहिती थेट या ॲपमध्ये जतन केली जाणार आहे.

ग्रामीण भागातील स्वच्छता राखून ठेवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी केंद्र शासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. या अभियानांतर्गत हगणदरीमुक्त झालेल्या गावांमधे शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासोबतच सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर, शाळा, अंगणवाडी तसेच गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या सोयी सुविधा आणि गावाची स्वच्छता कायम राखणे अशा विविध गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे.

वसई तालुक्यामध्ये एकूण ३१ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या ४९ गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. वेळोवेळी पंचायत समिती वसईच्या कर्मचाऱ्यांद्वारे या गावांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. पण, केंद्र सरकारच्या ताज्या निर्देशामुळे या सर्वेक्षणाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून सफाई ॲपच्या माध्यमातून वसई तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांना स्वच्छता सर्वेक्षणातील माहिती ॲपमध्ये भरावी लागणार आहे.

वारंवार केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणातून समोर येणारी माहिती तसेच जुनी माहिती जतन करून ठेवता यावी. तसेच कामात सुसूत्रता यावी म्हणून केंद्र सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.