वसई: वसई-विरार महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वसई पश्चिमेतील साईनगर क्रीडासंकुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एकेकाळी नागरिकांसाठी व्यायाम व सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र राहिलेले हे ठिकाण आज गर्दुल्ल्यांचा अड्डा बनत चालले आहे. त्याचप्रमाणे क्रीडासंकुलातील साहित्यांची नासधूस होऊन हे संकुलांची दयनीय अवस्था बनली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसई पश्चिमेतील नवघर-माणिकपूर भागात वसई विरार महानगरपालिकेकडून साईनगर क्रीडासंकुल बांधण्यात आले होते. या खेळाडूंसाठी क्रीडासंकुल, महिला आणि पुरुषांसाठी व्यायामशाळा आणि पहिल्या मजल्यावर खुला रंगमंच अशी या दुमजली क्रीडासंकुलाची रचना आहे. क्रीडासंकुल सुरु झाल्यापासून दरमहा २०० रुपये देऊन स्थानिक नागरिकांकडून क्रीडासंकुलातील व्यायामशाळेचा वापर केला जात होता. त्याचप्रमाणे क्रीडासंकुलातील खुल्या रंगमंचाचाही नाटक सादरीकरण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापर केला जात होता. पण कोरोनाकाळापासून महापालिकेने क्रीडासंकुलाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे क्रीडासंकुलाची अवस्था आता बिकट झाली आहे.
क्रीडासंकुलातील पुरुष व्यायामशाळेचा दरवाजा चोरीला गेला आहे तर व्यायामासाठीचे साहित्य ही चोरीला गेले आहे. तर व्यायामशाळेतील उरल्यासुरल्या सामानाचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली आहे. पुरुष व्यायामशाळेचे अवस्था बिकट असताना महिला व्यायामशाळेचे रुपातंरही महापालिकेचे गोदामात केल्याचे निदर्शनास आले आहे. महिलांच्या व्यायामशाळेत महापालिकेकडून बंद पडलेली साफसफाईची मशीन, बंद पडलेली व्यायामशाळेतील उपकरणे ठेवण्यात आली आहेत. तर दोन्ही व्यायामशाळांमधील फुटलेल्या खिडकीच्या काचा, गळके छत यामुळे क्रीडासंकुल अतिशय खिळखिळे झाल्याचे दिसून येते.
क्रीडासंकुलाच्या पहिल्या माळ्यावरही कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, नवीकोरी व्यायाम उपकरणे धूळ खात पडून आहेत.एकेकाळी नाटकं होत असलेल्या खुल्या रंगमंचाकडेही पालिकेने दुर्लक्ष केले आहे. या जागेचा वापर खाजगी मंडपवाले आपले सामान ठेवण्यासाठी करत आहेत, ज्यामुळे महापालिकेच्या जागेचा गैरवापर सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक नाईक यांनी केला आहे. पालिकेने या क्रीडा संकुलाकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ही नाईक यांनी पालिकेकडे केली आहे.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
दिवसेंदिवस भकास होत चाललेल्या या क्रीडासंकुलात सुरक्षेचा अभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने नशेबाजांचा वावर येथे वाढला आहे
व्यायामशाळेत सिगारेटची पाकिटे,मद्याच्या बाटल्या आढळून येतात, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
अहवाल सादर करण्याचे आदेश
साई नगर येथील क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेबाबत महापालिकेकडे तक्रारी येतात सदर संकुलाच्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश प्रभागीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या संकुलाकडे कोणी दुर्लक्ष केले व याची जबाबदारी कोणाची होती. या सर्व गोष्टींचा अहवाल मुख्यालयास सादर करावा अशा सूचना केल्या असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले आहे.