वसई : शाळेत येण्यास उशीर झाल्याने वसईतील शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली, परंतु त्यातील एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्रास झाला आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी आता जिल्हा शिक्षण विभागाकडून उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यातून येणाऱ्या अहवालानंतर त्यावर कारवाई केली जाणार आहे.
वसई पूर्वेत संबंधित शाळा असून, ८ नोव्हेंबर रोजी अनेक विद्यार्थी शाळेत उशिराने आले होते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. यात काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढल्या. यात या विद्यार्थिनीचाही समावेश होता. शाळेतून घरी परतल्यानंतर या विद्यार्थिनीची तब्येत बिघडली. त्यामुळे तिला सुरुवातीला वसईतील आस्था रुग्णालय, तेथून अन्य एका रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयातदाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला होता.
कुटुंबीयांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या घडलेल्या घटनेचे पडसाद ही सर्वत्र उमटले आहेत.
या घटनेनंतर रविवारी जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. घडलेली घटना गंभीर असल्याने त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी ( प्राथमिक) सोनाली मातेकर यांनी सांगितले आहे. या समितीत उपशिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, महिला विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचा समावेश असणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे. वसईच्या शिक्षण विभागाकडून आलेला प्राथमिक अहवाल आम्ही सादर केला आहे. समितीच्या चौकशीत ज्या बाबी निष्पन्न होतील त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पोलिसांकडूनही तपास सुरूच
वालीव पोलिसांनी सुद्धा या घटनेचा तपास सुरू केला आहे. अजूनही शवविच्छेदन अहवाल व अन्य अहवाल प्राप्त झाले नाहीत. जेव्हा हे अहवाल प्राप्त होतील त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी लोकसत्ताला सांगितले आहे.
नागरिकांकडून कॅन्डल मार्च
उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणामुळे वसई विरार शहर हादरले आहे. याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) यांच्या तर्फे कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित ससाणे यांनी सांगितले आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
विद्यार्थ्यांनीचा मृत्यूच्या घटनेला तीन दिवस झाले मात्र अजूनही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न केल्याने मृत मुलीच्या कुटुंबाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.आम्ही छोट्याशा घरात राहतो दिवसभर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. आम्हाला आमच्या मुलीला शिकवून मोठे करायचे होते. मात्र त्या आधीच शाळेच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गेला. आमच्या मुलीला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.
