वसई: मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यापाठोपाठ मंगळवारी सायंकाळी वसईच्या समुद्र किनारपट्टीवर तुफान वादळ सुटले होते. वादळी वारा व लाटांचा तडाखा यामुळे किनाऱ्यावर पट्टीवर बोटी सावरण्यासाठी मच्छीमारांची तारांबळ उडाली होती.

पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार मागील चार दिवसांपासून वसई विरार शहरात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे मच्छिमार व शेतकरी बांधव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे वादळीवाऱ्यामुळे शेकडो बोटीही किनाऱ्यावरच थांबून आहेत.

मंगळवारी सायंकाळी वसईच्या अर्नाळा, पाचूबंदर यासह अन्य समुद्र किनाऱ्यावर तुफान वादळीवारा सुटला होता. यासोबतच समुद्र ही खवळलेला असल्याने समुद्रात उंच उंच लाटा उसळत होत्या. या लाटांचे तडाखे मच्छिमारांनी नांगरून ठेवलेल्या बोटींना बसत होते. त्यामुळे त्या बोटींचा दोर तुटू नये याशिवाय अन्य बोटीवर आदळू नये यासाठी मच्छिमार बांधावांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले आहे.

किनाऱ्यावर जेव्हा वादळी वारे सुटते तेव्हा परिस्थिती अतिशय दयनीय होत असते. विशेषत बोटी आणि किनाऱ्यालगत असलेल्या घरांना याचा फटका बसत असतो त्यामुळे आमची चिंता अधिक वाढलेली असते असे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे.