वसई:- वसई पूर्वेतील सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत शिक्षकाने शाळेत उशिरा आल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यात एका १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांनीची तब्येत बिघडली होती. शनिवारी रात्री तिचा जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काजल (अंशिका) गौड असे मयत झालेल्या विद्यार्थ्यांनीचे नाव असून ती इयत्ता सहावी मध्ये शिकत होते.

वसई पूर्वेच्या सातीवली येथील कुवरा पाडा परिसरात श्री हनुमंत विद्यामंदिर शाळा आहे. यात पहिली ते आठवी पर्यँतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात काजल गौंड ही विद्यार्थीनी इयत्ता सहावी (अ) वर्गात शिकत होती. ८ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी अनेक विद्यार्थी शाळेत उशिराने आली होती. यात काजल या विद्यार्थ्यांनीचा समावेश होता. विद्यार्थी उशिरा आले म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यात काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढल्या.

शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली त्यामुळे तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर अन्य एका रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती आणखीनच खालावल्याने तिला मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

शाळा व्यवस्थापन व शिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलींवर ही वेळ आली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या घडलेल्या घटनेनंतर पालक व विद्यार्थ्यांनीही शाळेजवळ मोठी गर्दी केली होती.

पोलिसांकडून तपास सुरू

या घडलेल्या घटनेनंतर वालीव पोलिसांनी शाळेत व रुग्णालयात जाऊन तपासाला सुरवात केली आहे. जे जे रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले आहेत.या घटनेची संपुर्ण माहिती घेऊन पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती वालीव पोलिसांनी दिली आहे.

शिक्षण विभागाकडून चौकशी होणार

सातीवली येथील हनुमंत विद्यामंदिर शाळेत ६ वीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यूची घटना कळली आहे.त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी येऊन माहिती घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला जाणार आहे असे वसईचे गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच सर्व शाळांना शिक्षण विभागाकडून सूचना केल्या जातात आरटीई २००९ च्या शिक्षण कायद्यात अशी तरतूद आहे की विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा करणे हा गुन्हा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.