वसई- पावसाळ्यात धोकादायक ठरणार्या चिचोंटी धबधब्याजवळ शनिवारी पर्यंटकांनी एकच गर्दी केली होती. बंदी हुकूम डावलून पर्यंटक येथे हुल्लडबाजी करत होते. याची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पर्यटकांना बाहेर काढले.
नायगाव पूर्वेच्या चिचोंटी येथे असलेल्या डोंगरावर पावसाळ्यात धबधबा तयार होतो. त्यामुळे तेथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र हे ठिकाण पावसात धोकादायक ठरत असते. दरवर्षी पावसाळ्यात ४ ते ५ जणांचा धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू होत असतो. मागील वर्षी जुलै महिन्यातच ४ तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे पालघर जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांनी येथे मनाई हुकूम काढून बंदी घातली होती. शनिवारी सकाळपासून तेथे बंदी हुकूम डावलून पर्यटकांनी गर्दी केली होती. नायगाव पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पर्यटकांना बाहेर काढले.
हेही वाचा- सातारा : औषधांच्या नावाखालील बनावट ८७ लाखांची मद्यतस्करी पकडली
या ठिकाणी जाणारी पायवाट अरुंद आहे. दगडांवर शेवाळ साचल्याने ते निसरडे होऊन खाली पडण्याची शक्यता असते. धबधब्याचा डोह खोल असून पाण्याचा प्रवाह असल्याने पट्टीचे पोहणारे देखील बुडत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांनी जाऊ नये असे आवाहन नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी केले आहे.