वसईत गावकऱ्यांच्या पुढाकाराने तरुणांसाठी संवाद पूल
विरार : तरुण पिढीचे जग, त्यांच्या समोर असणारी आव्हाने, त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांना गावातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि मुख्य संवाद साधण्यासाठी आता वसई विरारच्या गावातील लोक एकत्र आले आहेत. यासाठी त्यांनी गावागावात ‘वुई आर विथ यु’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून संवाद सत्रांचे आयोजन केले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वसईतील गावांमध्ये तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच विरार पश्चिमेच्या आगाशी गावातील एका २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर वसईतील स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अस्वस्थेतून मार्ग काढण्यासाठी आणि तरुणांशी नव्याने संवाद पूल उभारण्यासाठी नंदाखाल परिसरात क्रॉस मित्र मंडळाकडून ‘वुई आर विथ यु’ उपक्रम सुरु केला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावातील तरुणांना एकत्र आणत त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. आणि यातूनच समाज म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा दिलासा आणि संदेश तरुणांना दिला जात आहे. आत्तापर्यंत पडई, गाजुरे, मोरवाडी, वटलई आणि अंगाळी या गावांमध्ये अशा प्रकारची संवाद सत्र घेण्यात आली. या सत्रांमध्ये तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.या चर्चासत्रातून आम्हाला नैराश्यांच्या प्रसगांना कसे खंबीरपणे सामोरे जायला हवे याची माहिती मिळाली आणि मोबाईल दूर ठेऊन प्रत्यक्ष संवाद साधणे गरजेचे आहे हे ही लक्षात आले. असे नंदाखाल येथील नियोला लोबो या तरुणीने सांगितले.
यावेळी स्टनी, एरिक, डॉमनिक, जेरॉल्ड, ग्रेगरी, रॉपसन, थॉमसन, मॅक्सि आणि रॉबर्ट लोबो आदींनी विविध विषयांवर तरुणांना मार्गदर्शन केले. अशी चर्चासत्रे गावागावात राबविली जावीत आणि तरुणाई सुरक्षित व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे मार्गदर्शकांनी सांगितले.
तरुणांना प्रेरणा मिळावी हाच उद्देश
केवळ संवादातूनच नाही तर गावातील इतर सामाजिक उपक्रमातून तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांमध्ये तरुणांना जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. या सगळ्यातून सकारात्मक वातावरण वाढून तरुणांना प्रेरणा मिळावी हाच उद्देश असल्याचे रॉबर्ट लोबो यांनी सांगितले.