वसई: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन व इतर मानवरहित हवाई यंत्राच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी निर्णय घेतला आहे. तसे आदेशही जारी केले आहेत.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाने देखील ठराविक कालावधीसाठी ड्रोन वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. काही असामाजिक तत्वांकडून ड्रोनचा वापर राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक ठरू शकतो. तसेच यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही बंदी लागू करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी आदेश पारित केले आहेत. ३ जून पर्यंत ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि अन्य लागू कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। या आदेशामुळे संबंधित कालावधीत कोणत्याही प्रकारचा ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र उडविणे, किंवा वापरणे प्रतिबंधित असेल. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्थळांजवळ हा निर्णय विशेषतः महत्त्वाचा मानला जात आहे.
बेकायदेशीर पणे ड्रोन उडविणाऱ्यावर कारवाई
ड्रोन वापरावर बंदी असतानाही काही वेळा ड्रोन उडविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा बेकायदेशीर पणे ड्रोन उडविणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या जो कोणी ड्रोन उडविताना आढळून येईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याशिवाय ड्रोन ही जप्त केला जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.