वसई:- विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २४ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही मागील ३२ तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळ पर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात आले होते. तर रात्रीही ही शोध मोहीम सुरू असल्याने गुरुवारी सकाळपर्यँत आणखीन ९ जणांना बाहेर काढले आहे. या बचाव कार्यात आतापर्यंत एकूण २४ जणांना इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. यात ९ जण जखमी आहेत. तर १५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. अजूनही बचाव कार्य सुरूच असून लवकरच अन्य अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
आतापर्यंत मृतांची नाव
आरोही जोविल (२४), उत्कर्षा जोविल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया निवळकर (३८), पार्वती सकपाळ (६०) दीपेश सोनी ( ४१), सचिन नेवाळकर (४०), हरीश सिंग बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४१), कशिश पवन सहेनी (३५), शुभांगी पवन सहेनी (४०), गोविंद सिंग रावत (२८), दीपक सिंग बोहरा (२५) असे आतापर्यंत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
जखमींची नावे
जखमींमध्ये संजय सिंग(२४), मिताली परमार(२८) प्रदीप कदम( ४०) जयश्री कदम (३३) विशाखा जोविल (२४), मंथन शिंदे (१९) प्रभाकर शिंदे (५७), प्रमिला शिंदे (५०) प्रेरणा शिंदे (२०) अशी नऊ जण जखमी असून त्यांच्यावर वसई विरार मधील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.