वसई : वसई विरार शहरात कडाक्याच्या उन्हाने नागरिकांचा घामटा काढला असतानाच आता शहरात विविध ठिकाणच्या भागात डासांचा उपद्रव वाढला आहे. डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांना प्रचंड त्रास करावा लागतो. शहरातील सांडपाणी वाहून नेणारे नाले, उघडी गटारे, काही ठिकाणी तुंबलेली गटारे अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती वाढू लागली आहे.

त्यातच काही ठिकाणी गटाराचे सांडपाणी हे गवत उगविण्यासाठी पंपाद्वारे जमिनीवर सोडले जात आहे. या वाढत्या दुर्गंधी व दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सकाळ आणि संध्याकाळ ही डास चावत असतात. याचा मोठा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यासह इतर आजार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विशेषतः सायंकाळी वसई पश्चिमेच्या भागात दुचाकीवरून प्रवास करताना डासांचे थवेच्या थवे समोर येतात. काहीवेळा ते डोळ्यात ही जातात असे वाहनचालकांनी सांगितले आहे. शहरात अनेक ठिकाणी उघड्या नाल्यात तयार होणाऱ्या पानवेली काढून टाकण्यात आल्या नाहीत. डासांची समस्या इतकी प्रचंड आहे की दिवसभर नागरिकांना खिडक्या दारे बंद करून घरात राहावे लागत असून डासांच्या भीतीने बाहेरून येणारी मोकळी हवा ही घेता येत नाही असे नागरिकांनी सांगितले आहे.

नवघर माणिकपूर परिसरातील गवत आणि झाडाझुडपांमुळे तसेच, परिसरातील सांडपाणी अनेक ठिकाणी थेट वसई खाडीमध्ये येत असल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. सोसायटीतून वाहून आलेला कचरा साचल्याने डासांची संख्या वाढली आहे. यामुळे सनसिटी, खाडीकिनारा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे आगरी कोळी सेनेचे जिल्हाध्यक्ष भुपेश कडुलकर यांनी सांगितले आहे. डासांची वाढती समस्या लक्षात घेता. पालिकेने योग्य ती उपायोजना करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहे.वसई विरार शहरात औषध फवारणी ही दैनंदिन कामे सुरूच आहेत. याशिवाय आता नालेसफाईचे काम ही सुरू केले आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना पालिका करीत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांना मच्छरदाणी आणि अगरबत्ती भेट

डासांची समस्या वाढत आहे. असे असताना त्याकडे महापालिका त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकीकडे नागरिकांची डासांच्यामुळे झोप उडाली आहे. तर दुसरीकडे अधिकारी निवांत आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना मच्छीर दाणी, अगरबत्ती, ऑलआऊट बॅट अशा वस्तू भेट देत भुपेश कडुलकर यांनी डासांची समस्या निदर्शनास आणली आहे.

डास निर्मूलन अपयशी

डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून एकात्मिक डास नियंत्रण व निर्मूलन या आधुनिक पद्धतीचा वापर करून डास नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. कीटक निर्मुलनासाठी लागणारी विविध औषधे यांचा वापर केला जातो. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. डासांची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने डास निर्मूलन यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.