शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या ही वाढू लागली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा ही बाब नित्याची झाली आहे. अनेकदा कारण नसताना अचानक रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढते आणि वाहतूक नियंत्रणात अडथळे निर्माण होतात. याचा फटका सर्वसामान्य प्रवासी, शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णवाहिका यांना बसतो. मात्र वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता आतापर्यंत शहरात कोणत्याही ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम शहरातील मुख्य रस्त्यांसह जोड रस्त्यांवरही दिसून येत आहे. शहरात नवे पर्यायी रस्ते निर्माण होण्याचे प्रमाण ही अत्यल्पच आहे. त्यामुळे वाहतूक समस्याही दिवसेंदिवस अधिक बिकट होऊ लागली आहे. यात मुख्य रस्त्यासह इतर मार्गांवर करण्यात आलेली अतिक्रमणे, अरुंद रस्ते, मुख्य रस्त्यांवर उभी असणारी खाजगी वाहने. यातही सार्वजनिक रस्त्यावर खाजगी प्रवासी बसेस मोठ्या प्रमाणावर उभ्या असतात. तसेच अनेक ठिकाणी वाहनतळांचा अभाव असल्याने प्रवासी रत्यावरच गाड्या उभ्या करतात. यामुळे समस्येत अधिकच भर पडते. परिणामी अनेकदा शहरात अंतर्गत प्रवास करण्यास दीड ते दोन तास इतका कालावधी लागून नागरिकांचा वेळ वाया जातो.
रिंगरूट प्रकल्प रखडलेलाच
नागरिकांचे दळणवळण करण्याचे मार्ग सुखकर व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने रिंगरूट प्रकल्पाचा समावेश होता. विशेषतः हा प्रकल्प पालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प असून यात ४ शहरे आणि २२ गावांना एकाच रस्त्याने रिंगरूट प्रकल्पाने जोडले जाणार आहे. यासाठी ४० मीटरचा रुंदीचा आणि ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता असे प्रकल्पाचे नियोजन होते. मात्र यासाठी लागणारा निधी, जागांचे अडथळ्यांसह अन्य अडचणी यामुळे या प्रकल्पाचे काम अजूनही पूर्ण होऊ शकले नाही. या अडथळ्यांची शर्यत लक्षात घेता आता पुन्हा या प्रकल्पाला संजीवनी देण्यासाठी शासन स्तरावरून नव्याने सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
नव्या उड्डाणपुलांचे निर्माण कधी ?
सध्या शहरात पूर्व- पश्चिम प्रवास करण्यासाठी केवळ चारच उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. आता ते पूल ही अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे पुलांच्या दोन्ही बाजूने सातत्याने कोंडी असते. विरार-नारिंगी असा पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलाचे काम मागील चार ते पाच वर्षापासून रखडला असल्याने असल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा कोंडीतून सुटका व्हावी यासाठी ठिकठिकाणी पालिकेने १२ उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. यात माणिकपूर नाका, रेंज ऑफिस, श्रीपस्थ पाटणकर पार्क जंक्शन,चंदन नाका जंक्शन, लक्ष्मी शॉपिंग सेंटर जंक्शन, बोळींज खारोडी नाका, सायन्स गार्डन, मनवेलपाडा, फुलपाडा, बाभोळा नाका, वसंत नगरी,नारिंगी, साईनाथ नगर यांचा समावेश आहे. याशिवाय ४ रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत. जेव्हा हे पूल तयार होतील तेव्हा येथील कोंडी संपुष्टात येथील असा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात या पुलाचे कामाला गती देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
रस्त्यांचे काँक्रिटिकरण कागदावरच
शहरात जागोजागी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना खड्डे चुकवत प्रवासाला सामोरे जावे लागते.यामुळे अपघाताचा धोका ही वाढू लागला आहे. याशिवाय वाहनांच्या वाहतुकीचा वेग ही मंदावत असतो त्याचे रूपांतर हे कोंडीत होते. वाहतुकीला गती व नागरिकांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी रस्त्यांचे काँक्रिटिकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यात प्रमुख सात रस्ते आहेत. याशिवाय पहिल्या टप्प्यात शहरातील ५१ ठिकाणचे रस्ते काँक्रिटिकरण केले जाणार असल्याची घोषणा ही पालिकेकडून करण्यात आली आहे. वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने वेळोवेळी पालिकेकडून विविध घोषणा केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी होणे ही आता काळाची गरज आहे.यासाठी तातडीने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. वाहतूक नियोजन प्रत्यक्षात अंमलात आले तरच आगामी काळात शहरातील कोंडी नियंत्रणात येईल अन्यथा शहराची कोंडीचे शहर अशी ओळख होण्यास वेळ लागणार नाही.
वाहतूक धोरणाची अंमलबजावणी रखडली
वाहतूक समस्या सोडवण्यासाठी दीड वर्षांपूर्वी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने वाहतूक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पार्किंग -नो पार्किंग जागा निश्चित केल्या होत्या. त्यानुसार वसई विरार पालिकेकडून उपाययोजना करून देण्यासाठी पत्रव्यवहार ही करण्यात आला आहे. मात्र त्याला पालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अजूनही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकली नाही. या दोन्ही यंत्रणांकडून वाहतुकीचा प्रश्न प्रभावीपणे हाताळला जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महापालिकेची यंत्रणा केवळ परवानगी देण्याशिवाय इतर बाबींकडे लक्ष देत नसल्याची परिस्थिती आहे. निवासी इमारती, व्यावसायिक संकुलांची परवानगी देत असताना तिथे येणाऱ्या वाहनधारकांच्या पार्किंगचे नियोजन काटेकोरपणे करत नसल्याने ही वाहने रस्त्यावर येत आहेत. त्याचा परिणाम शहरातील रस्त्यावर होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे.