वसई – वसई-विरार शहरात प्लास्टिकबंदी असूनही त्याचा सर्रास वापर सुरू असल्याने अखेर महापालिकेने पुन्हा एकदा कारवाईची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी पालिकेने एका प्लास्टिक गोदामात धाड टाकून साडेतीन हजार किलो प्लास्टिक जप्त केले आहे.
वसई-विरार महापालिकेने काही काळापूर्वी प्लास्टिकबंदीची घोषणा केली होती, परंतु त्यानंतरही भाजी विक्रेते, फळ विक्रेते, दुकानदार आणि फेरीवाले यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर सुरू आहे. छुप्या मार्गाने शहरात येणाऱ्या या प्लास्टिकमुळे कचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या कडेला, तलावांमध्ये आणि समुद्रकिनाऱ्यांवर प्लास्टिकचा ढिग साठत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष पथके नियुक्त केली असून, पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.
८ ऑगस्ट रोजी वसई पूर्वेच्या भागात एका प्लास्टिक पिशव्या ठेवलेल्या गोदामात धाड टाकली. यात साडेतीन हजार किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सदरची कारवाई आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अर्चना दिवे, सहायक आयुक्त नीता कोरे, आरोग्य निरीक्षक विकास पाटील यांच्या पथकाने केली आहे.
ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास
शहरात प्लास्टिकचा वापर वाढत असला तरी त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे रस्त्यांवर, तलावांमध्ये आणि समुद्रकिनाऱ्यांवर प्लास्टिकचा ढीग साठत आहे. पावसाळ्यात गटारे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी हे प्लास्टिक अडकून राहते, ज्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, शहराची सुंदरताही बाधित होत आहे.