वसई : दसऱ्याच्या निमित्ताने वसई विरार शहरात विविध ठिकाणी फुल बाजार बहरला आहे. झेंडूची फुले व त्यापासून तयार केलेल्या तोरणांना बाजारात चांगलीच मागणी मिळू लागली आहे. विशेषतः झेंडूची फुले, भाताची कणसे, आंब्याची पाने गुंफून तयार केलेल्या तोरणाची मागणी वाढली आहे. ४० ते ५० प्रतिमीटर भावाने अशा तोरणांची विक्री केली जात आहे. यामुळे वसई विरारच्या ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला रोजगार प्राप्त झाला आहे.

दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या निमित्ताने फुल बाजारात फुलांना व त्यापासून तयार करण्यात आलेल्या तोरणांना विशेष महत्व आहे.  वसईच्या विविध ठिकाणचे फुल शेतकरी व ग्रामीण भागात राहणारे नागरिक झेंडूची फुले व तयार केलेली तोरणे विक्रीसाठी बाजारात येऊन येतात. झेंडूची फुले, भाताची कणसे, आंब्याची पाने गुंफून तयार केलेल्या तोरणांना चांगली मागणी आहे.

विशेषतः वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात आजही ही शेताबांधावर झेंडू फुलांची लागवड केली जाते. शेतकरी बांधव घरच्या घरी झेंडूची फुले, आंब्याची पाने, भाताची कणसे असे एकत्रित तोरण तयार करून शहरातील बाजारात विक्रीला घेऊन येत असतात. यंदा पावसाचा जोर असल्याने फुल उत्पादन कमी झाले आहे. यामुळे यंदा विक्रीसाठी आणलेल्या तोरणांची संख्या कमी आहे असे विरारच्या ग्रामीण भागातील गणेशपुरी येथील शेतकरी भास्कर जाधव यांनी सांगितले. झेंडूचे तोरण ४० ते ५० रुपये प्रतिमीटरने विक्री केली जात आहे.

या तोरण विक्रीतुन येणाऱ्या पैशांतूनच पुढील दिवाळी सणाचे  नियोजन करता येणार आहे. त्यासाठी तोरण तयार करून ते विक्रीसाठी आमची मेहनत सुरू आहे असे ग्रामीण भागातील तोरण विक्रेत्या महिलांनी सांगितले. या तोरण विक्रीतून दोन पैसे हाती येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना हंगामी रोजगार मिळाला आहे.

आपट्याच्या पानांचे सोने विक्रीला

दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडांची पाने लुटण्याची परंपरा आहे. म्हणून या पानांनाही बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी आपट्याच्या पानांच्या छोट्या जुड्या करून विक्रीला आणल्या होत्या. या जुड्या दहा ते वीस रुपये किंमतीने विकल्या जात होत्या.