विरार : गणेशोत्सव काळात मिरवणुकांमध्ये अनेकदा प्रकाश यंत्रणा ( लेझर लाईट) वापरली जाते. या लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लाईट मिरवणुकांमध्ये वापरू नये असे पोलिसांनी सांगितले आहे.
वसई विरार शहरात ही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. विविध ठिकाणी सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. त्यांचे आगमन व विसर्जन या दरम्यान शहरात मिरवणुका काढल्या जातात. अनेकदा मिरवणुकीत झगमगाट करण्यासाठी विविध प्रकारच्या लेझर लाईटचा वापर केला जात असल्याचे प्रकार दिसून येत आहे. अशा लेझर लाईटचा परिणाम थेट डोळ्यांवर होत असतो. काहीवेळा अशा लाईट मोठ्या प्रमाणात डोळ्यावर प्रकाशित झाल्यास अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नुकताच पालिकेच्या मुख्यालयात गणेशोत्सव बैठक पार पडली यावेळी नागरिकांनी मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर टाळावा अशी सूचना केली होती. त्याच अनुषंगाने पोलिसांनी लेझर लाईटचा वापर करणे टाळावे असे आवाहन नागरिकांना केले आहे. जे अशा लाईटचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला.
शहरात डीजेवरही बंदी
सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडपात परिसरात ध्वनिक्षेपकाचा वापर कायदेशीर मर्यादेतच करावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डीजे लावण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात तपासणी करण्यासाठी एक विशेष फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे.