वसई: श्रावण महिन्याची सुरुवात होताच, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने वसई-विरार शहरात पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, याचा फटका शाळकरी मुलांसह वाहनचालक आणि कामावर निघालेल्या नागरिकांना बसला आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच वसई-विरार शहरात पावसाने जोर धरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात एकूण १२७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मांडवी मंडळ आणि पेल्हार परिसरात सर्वाधिक ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर इतर भागांतही पावसाची रिपरिप सुरु आहे.

या पावसामुळे शहरातील अनेक म भागांत पाणी साचल्याचे चित्र होते. विरार येथील विवा महाविद्यालय परिसर, साईनाथ नगर, बोळींज, ग्लोबल सिटी यासह नालासोपारा येथील अलकापुरी, गाला नगर, संकेश्वर नगर आणि रेल्वे स्थानक परिसरांत पाणी साचले. तसेच, वसईतील माणिकपूर, वसई गाव, बंगाली नाका, देवतलाव आणि नायगाव पूर्वेकडील स्टार सिटी, रिलायबल, सनटेक यांसारख्या विविध ठिकाणीही पाणी भरले होते.

विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. अनेक रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे कामावर निघालेल्या नागरिकांना आणि शाळकरी मुलांना चिखलमय रस्त्यांतून वाट काढत जावे लागले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर देखील संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती, ज्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांच्या रांगा

वसई विरार शहरात पावसाने सकाळपासूनच जोर धरला असल्याने त्याचा मोठा परिणाम वाहतूक सेवेवर झाला आहे. विशेषतःऑटो रिक्षा व बस या सुद्धा वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. तर नालासोपारा व नायगाव भागात प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.