वसई: कार्तिकी एकादशीनंतर सर्वत्र तुळशी विवाहाचा (Tulsi Vivah) उत्साह शिगेला पोहोचलेला असताना वसई-विरार शहरात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली. सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू असताना, अचानक कोसळलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे.
मान्सून परतूनही राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. तुळशी विवाहाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अंगणात, गच्चीवर आणि सार्वजनिक ठिकाणी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. तर, ढगाळ वातावरणामुळे सकाळपासूनच वातावरणात गारवा जाणवत असताना दुपारनंतर मात्र अचानक आकाशात ढग दाटून आले आणि पावसाच्या जोरदार सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. तुळशी विवाहासाठी केलेले मांडव, रोषणाई आणि सजावट यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून. ऐन वेळी पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. थंडीचे आगमन लांबले असून, कधी ऊन तर कधी पाऊस अशा लहरी हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कधी तीव्र उष्णता तर कधी अचानक पडणाऱ्या पावसामुळे वातावरणातील आर्द्रतेत मोठा बदल होत आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या मौसमी आजारांमध्ये वाढ झाली असून, नागरिक त्रस्त आहेत.
अवकाळी पावसाचा शेतीला फटका
अवकाळी पावसामुळे वसई विरार शहरातील ग्रामीण भागात करण्यात आलेल्या भात शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांच्या शेतात लावण्यात आलेले भाताचे पीक आडवे झाले आहे. तर, काहींचे पिक कापणीविना शेतातच पडून आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
