वसई : वसई विरार शहरात पालिकेच्या रुग्णालयात विविध आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. मागील अडीच वर्षात केवळ ६०० सामान्य शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यात ॲपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसीले अशा आजारांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वसई विरार शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सेवा पुरविली जाते. या आरोग्य सेवेसाठी सद्यस्थितीत शहरात पालिकेची २ माताबाल संगोपनकेंद्र , ७ रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३५ आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत. त्याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते. यात सर डी एम पेटिट, श्री जीवदानी रुग्णालय, विजयनगर तुळींज, सोपारा सामान्य रुग्णालय, कौलसिटी, बोळींज, जूचंद्र या रुग्णालयात शस्त्रक्रिया प्रक्रिया पार पडतात.
मात्र सामान्य शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. २०२३ ते मे २०२५ या अडीच वर्षाच्या कालावधी मध्ये ५९८ सामान्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात ॲपेंडिक्स १०२, हार्निया २४४, हायड्रोसीले १५१ आणि पाईल्सच्या १०१ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तर हाडांशी संबंधित खुबे, सांधे, गुडघे व अस्थीभंग शस्त्रक्रिया अशा केवळ १३३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. म्हणजे प्रतिवर्ष ४४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत असे माहिती अधिकार कार्यकर्ते महेश निकम यांनी सांगितले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागात पूर्णवेळ अस्थिरोग तज्ञ असतानाही या शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी आहे. विशेषतः येथील बहुतांश रुग्ण मुंबई सारख्या ठिकाणच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते तिथे ही त्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागते असे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी सांगितले आहे. महापालिकेकडून जास्त करून प्रसूतीच्या शस्त्रक्रियेवर भर असला तरी इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा जेणेकरून येथील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी उपचार घेण्याचा फेरा वाचेल असेही ढगे यांनी सांगितले आहे.
२३ हजारांहून अधिक सर्वसामान्य प्रसूती
वसई विरार महापालिकेची माताबाल संगोपन केंद्र व अन्य रुग्णालयात गर्भवती महिलांची तपासणी व प्रसूतीचे प्रमाण जास्त आहे. जूचंद्र, बोळींज, सर्वोदय वसाहत, सर डी एम पेटीट रुग्णालय, सातिवली, सोपारा रुग्णालय, तुळींज रुग्णालयात मागील अडीच वर्षात २३ हजार ९१२ सर्वसाधारण प्रसूती झाल्या आहेत. सी-सेक्शन (सिझेरियन) ८ हजार २४८ प्रसूती, २ हजार ८२८ नसबंदी आणि १८३ गर्भाशयाच्या पिशव्या काढणार्या अशा इतर शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा
नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील दोनशे खाटांच्या रुग्णालयासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात २५ कोटी निधी देण्याचे निश्चित केले आहे.असे जरी असले तरी आता रुग्णालय बांधण्यासाठी निश्चित केलेल्या जागेचा तिढा निर्माण झाल्याने रुग्णालयाचे काम आणखीन लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे या रुग्णालयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे
पालिकेकडून सुविधा देण्याचा प्रयत्न सुरूच
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णांना चांगली सुविधा पुरविण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया ही पालिकेच्या रुग्णालयात पार पडत आहेत. परंतु मोठे जे आजार आहेत त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यपूर्ण यंत्रणा असायला हवी ती नसल्याने अडचणी येतात. काही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुपर स्पेशालिस्ट सर्जनची गरज भासते असे पालिकेच्या मुख्यवैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले आहे. कौलसीटी येथेही शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.