वसई: सवलतीच्या दरात रुग्णांना सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा बसविली आहे. मात्र ही यंत्रणा हाताळणी करण्यासाठी मागील काही वर्षांपासून कायमस्वरूपी डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने ही सातत्याने ही यंत्रणा बंदच असल्याचे चित्र दिसून येत आहे. या आर्थिक भुर्दंड मात्र सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागत आहे.

वसई विरार शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सेवा दिली जात आहे. या आरोग्य सेवेसाठी सद्यस्थितीत शहरात पालिकेची  २ माताबाल संगोपनकेंद्र , ७  रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३५ आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत. त्याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते. पालिकेच्या रुग्णालयात मोफत सेवा मिळत असल्याने मोठ्या संख्येने रुग्ण हे पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात.

महापालिकेने गर्भवती महिला व अन्य रुग्ण यांच्या सोनोग्राफीसाठी सर डी एम पेटिट, जूचंद्र रुग्णालय, तुळींज रुग्णालय अशा तीन ठिकाणी सोनोग्राफी यंत्रणा बसविल्या आहेत. सुरवातीला विशेषतः गर्भवती महिलांच्या प्रसूती पूर्व सोनोग्राफी करण्यात येत होत्या.

त्यानंतर  ही यंत्रणा हातळण्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने सातत्याने यंत्रणा बंदच राहू लागल्या आहे.  सोनोग्राफी यंत्रणा बंद असल्याने गर्भवती महिला यासह अन्य रुग्णांना  खासगी सोनोग्राफी केंद्रात जावे लागत आहे. जिथे सवलतीच्या दरात काम होते तिथे आता हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. यामुळे गोर गरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

या केंद्रात सोनोग्राफीसाठी पालिकेने कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा पालिकेकडे केली आहे. मात्र अजूनही डॉक्टर मिळाले नसल्याने  सोनोग्राफी यंत्रणा बंद ठेवाव्यात लागत आहे. पालिकेकडून मिळणारे मानधन हे अपुरे असल्याने त्याठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर राहण्यास टाळाटाळ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेडिओलॉजिस्ट नियुक्ती साठी प्रयत्न

महापालिकेकडून कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्ट उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वैद्यकीय आरोग्य विभागाने सांगितले आहे.  याबाबत लवकरच शहरातील खासगी सोनोग्राफी करणारे डॉक्टर यांची भेट घेऊन त्यांना आवाहन केले जाईल असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्ती हवी 

वसई विरार महापालिकांच्या रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट डॉक्टर कायमस्वरूपी असणे आवश्यक आहे मात्र पालिकेकडून दिले जाणारे मानधन हे अगदी तुटपुंज्या स्वरूपाचे असल्याने काम करण्यास तयार होत नसल्याने या अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

गर्भवती महिलांना अडचणी

गर्भवती महिलांच्या प्रसूती पूर्व विविध प्रकारच्या तपासण्यासह काही वेळा सोनोग्राफी सुद्धा करावी लागते. मात्र यंत्रणा बंद असते तेव्हा त्यांना खासगी सोनोग्राफी केंद्राचा आधार घ्यावा लागतो. जिथे अवघ्या साडेतीनशे रुपयात काम होत होते तिथे आता एक हजाराहून अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.