वसई: विरार मध्ये निर्माणाधीन इमारतींच्या १३ व्या मजल्यावरून खाली पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. जिंदप्पा माला (४७) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. लिफ्टच्या डक्टजवळ काम करत असताना त्याचा तोल गेल्याने हा अपघात घडला आहे.

विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीप विनय युनिक ( स्काय ) इमारतीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी जिंदप्पा हा मजूर १३ मजल्यावर बांबू बांधण्याचे काम करीत होता. लिफ्ट डक्टजवळच्या भागातच हे काम सुरू असताना त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली आहे.

सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष

इमारतीच्या ठिकाणी काम करण्यासाठी येणाऱ्या मजुरांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच साधने पुरविली जात नाहीत व जे नियम आहेत त्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत असते त्यामुळे अशा दुर्दैवी घटना समोर येत असतात अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा मजुरांची सुरक्षा व त्यांना पुरविली जाणारे सुरक्षा साधने यावर प्रश्न उपस्थित झाला आहे.