वसई:  वसई विरार शहरात महावितरणने विविध ठिकाणच्या भागात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आली आहेत. या स्मार्ट मीटरमुळे वीज चोरीच्या घटना नियंत्रणात येतील असा दावा महावितरणने केला आहे.

महावितरणच्या वसई मंडळाच्या अंतर्गत शहरात घरगुती, व्यावसायिक, शासकीय, औद्योगिक अशा विविध साडे दहा लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र काही वीज ग्राहक मीटर मध्ये फेरफार करून वीज चोरी करतात. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची वीज चोरी झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती.  मीटर सदोष असल्याने वीज देयक रक्कम व रिडींग यात तफावत आढळून येते. तर तांत्रिक अडचणीमुळे मीटर गणन योग्य पद्धतीने होत नाही याचा फटका महावितरणसह वीज ग्राहकांना बसत आहे. यात पारदर्शकता यावी तसेच अचूक वीज देयक ग्राहकांच्या हाती जावे यासाठी शहरातील लघुदाब वीज ग्राहकांकडे अत्याधुनिक असे टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे.

जुने वीज मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावले जात आहेत. आतापर्यंत २ लाख ६३ हजार १५४ ठिकाणी स्मार्ट मीटर बसविली आहेत. यात फिडर मीटर, डिटीसी मीटर, शासकीय कार्यालये यासह वीज ग्राहक अशा ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यात आली असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

वीज चोरी नियंत्रणात 

स्मार्ट मीटरमुळे छुप्या मार्गाने होणारी चोरी नियंत्रणात आणता येणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. नुकताच लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरला चुंबक लावून व त्यात फेरफार करून वीज चोरी करण्याचा प्रकार केला होता. त्यांची माहिती थेट आमच्या सिस्टमला कळत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. मीटर फेरफार करणे, विद्युत प्रवाह (करंट) समतोल नसणे,  कमी पॉवर फॅक्टर असणे, न्यूट्रल डिस्टर्बन्स, करंट किंवा व्होल्टेज कमीजास्त असणे, विद्युत प्रवाह नसणे, सिटी व पीटी बायपास करणे अशी सर्व माहिती ऑनलाइन स्वरूपात समोर येत आहे. या वीज चोरी वर लक्ष ठेवण्यासाठी दोन पथके ही नियुक्त केली आहे असे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे. 

४३ हजार सदोष वीज मीटर बदलले 

वीज मीटर मध्ये काही वेळा तांत्रिक अडचणी येऊन ती सदोष ठरत असतात. तर काही वेळा मीटर फारच जुनी झाली असल्याने सुद्धा सदोष होत आहेत. मीटर सदोष असल्याने मीटरमध्ये वीज वापराचे युनिट गणन (रिडींग) घेताना अडचणी येतात. विजेचा वापर किती झाला याची अचूक माहिती समोर येत नाही.अनेकदा वीज देयक जास्त आकारले जात असल्याच्या तक्रारी ग्राहक करीत असतात. तर काही जणांना मीटरच सदोष असल्याने नाममात्र देयक येत असल्याचे समोर आले आहे. अशी वीज मीटर बदलण्यात येत आहेत. आतापर्यंत ४३ हजार ८२४ इतके वीज मीटर बदलण्यात आले आहेत.

स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम आतापर्यंत २८ टक्के इतके झाले आहे. या स्मार्ट मीटरची संपूर्ण माहिती ऑनलाइन स्वरूपात सिस्टम मध्ये येत असल्याने वीज चोरीचे प्रकार पकडणे सोपे झाले आहे. नुकताच दोन ते तीन ग्राहकांनी मीटरला चुंबक लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. – संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण वसई