वसई: महावितरणच्या प्रस्तावित खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि प्रीपेड स्मार्ट मीटर धोरणांविरोधात बुधवारी वसईमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे. वसई पूर्वेतील महावितरणच्या कार्यालयाबाहेर हा संप सुरू असून, २५ हून अधिक संघटनांचे कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. यामुळे महावितरणकडून पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधा ठप्प झाल्याने सामान्य नागरिकांचे मात्र हाल होताना दिसत आहेत.

वसई-विरार शहरात महावितरणच्या उपकेंद्रांमधून वीज पुरवठा केला जातो. मात्र, अलिकडेच काही खासगी कंपन्यांनी महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरणाचा परवाना मिळावा यासाठी अर्ज केले आहेत. सरकारकडून केले जाणारे महावितरणच्या उपकेंद्रांचे खाजगीकरण, कंत्राटीकरण, प्रीपेड स्मार्ट मीटर सक्ती, रखडलेल्या पेन्शन योजना आणि कर्मचाऱ्यांची भरती अशा प्रमुख १४ मागण्यांसाठी आज वसई पूर्वेतील महावितरण कार्यालयासमोर संप पुकारण्यात आला आहे. संपात सहभागी झालेले कर्मचारी आज दिवसभर कोणतेही काम करणार नाहीत असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात आज आम्ही हा संप पुकारलेला आहे. सरकारला कर्मचाऱ्यांनी दिलेला हा पहिला इशारा आहे. यानंतरही जर सरकारने खाजगीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन केले जाईल, अशी प्रतिक्रिया वसई वर्कस सर्कल सचिव संजय तिडके यांनी सांगितले. तर, सरकारचे खाजगीकरणाचा धोरण महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता सरकारने हे धोरण मागे घेणे गरजेचे आहे, असे मत मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केले आहे.

संपामुळे नागरिकांचे हाल

सकाळी १० वाजल्यापासूनच महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्यामुळे वीजदेयक भरणे तसेच इतर सुविधा बंद आहेत. संपाची पूर्वकल्पना नसल्यामुळे अनेक नागरिकांनी वीजदेयक भरण्यासाठी केंद्रावर गर्दी केली होती. मात्र, वीजदेयक भरणा केंद्र असल्यामुळे नागरिकांना देयक न भरताच माघारी परतावे लागले. यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठेकेदार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महावितरण कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी महावितरण प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अधिकाऱ्यांकडून काही कंत्राटी कर्मचारी आणि ठेकेदारांची नियुक्ती विजेसंबंधित तातडीची कामे पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. संपाच्या दिवशी शहरात कुठेही विजेसंबंधी समस्या निर्माण झाल्यास, ठेकेदारांमार्फत त्या सोडवल्या जातील, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.