वसई: वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील स्मशानभूमीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि आवश्यक सुविधांसाठी अखेर निधीची तरतूद करण्यात आली आहे. मागील काही वर्षापासून स्मशानभूमीत कार्यरत कर्मचाऱ्यांकडून तसेच नागरिकांकडून स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार केली जात होती. याच तक्रारीची दखल घेत पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
वसई-विरार महानगरपालिका हद्दीत एकूण ८८ स्मशानभूमी असून, येथे अनेक कंत्राटी कर्मचारी व मजूर कमी मानधनावर काम करत आहेत. मात्र, बहुतांश स्मशानभूमींमध्ये या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यांच्या विश्रांतीसाठी केबिन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच दैनंदिन कामासाठी लागणारे हातमोजे आणि गमबूट यांसारखी आवश्यक सुरक्षा साधनेही उपलब्ध नाहीत. यामुळे त्यांना सरपटणारे प्राणी, भटकी जनावरे आणि डासांच्या प्रादुर्भावासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात, माजी स्थायी समिती सदस्य किशोर पाटील यांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांना निवेदन सादर करून तातडीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची दखल घेत स्मशानभूमी विभागाचे उपायुक्त दीपक झिंझाड यांनी, प्रभाग समिती ए ते आयमधील विविध स्मशानभूमींची दैनंदिन सुरक्षा, देखभाल आणि इतर कामांसाठीच्या सन २०२५-२६, २०२६-२७ व २०२७-२८ या त्रैवार्षिक निविदेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुरक्षा साहित्य व वस्तूंची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती दिली आहे.