वसई : वसई विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी दुसऱ्यांदा मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत विविध प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने दुसरी निविदा ही रद्द करण्यात आली आहे. दीड वर्षापासून निविदांचा खेळ सुरू असून आता तिसऱ्यांदा निविदा काढण्यासाठीच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.वसई विरार महापालिका कार्यक्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई, गटार स्वच्छता, वर्गीकृत आणि विलगीकृत कचरा संकलन करणे व संकलित कचराभूमीवर वाहतूक करणे या कामासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सन २०२५- २६, २०२६- २७ आणि २०२७- २८ या त्रिवार्षिक निविदा २०२४ च्या अखेरीस मागविण्यात आल्या होत्या.

दैनंदिन रस्ते सफाई आणि उघडी गटारे सफाई करण्यासाठी प्रति किलोमीटर याप्रमाणे, बंदिस्त गटारावरील चेंबर्सची सफाई प्रति चेंबरनुसार तसेच वर्गीकृत व विलगीकृत कचरा संकलन करून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी प्रति टन यानुसार निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे महापालिकेच्या मालकीच्या टिपर, कॉम्पॅक्टर आणि जेट कम सक्शन या यंत्रांसाठी दर महिन्याला भाडे किती देणार या बाबींचा समावेशही निविदेत होता. त्यावेळी कंत्राटदारांनी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यास दिलेले लघुतम दर महापालिकेला मान्य नसल्याने वाटाघाटीसाठी बैठक घेण्यात आली. मात्र वाटाघाटी दरम्यान महापालिकेला अपेक्षित तत्त्वानुसार कंत्राटदारांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे सदरची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली.

त्यानंतर पुन्हा मे २०२५ मध्ये नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. दुसऱ्यांदा निविदा काढताना महापालिकेने पुन्हा जुन्याच मनुष्यबळ व यंत्र सामग्री पुरवठा अशा ठेका पद्धतीने आणि ९ प्रभागांसाठी स्वतंत्र निविदा मागविल्या . त्यामुळे या कामासाठी कंत्राटदारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. यात ५६ निविदा पालिकेला प्राप्त झाल्या होत्या.

दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार असलेल्या मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा.लि. या कंपनीने निविदा भरलेल्या कंत्राटदारांकडून अनुभव प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. निविदा धारकांनी सादर केलेल्या काही प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराने संबंधित एजन्सी, तसेच त्यांनी काम केलेल्या महापालिकेकडून माहिती मागविली असता, काही निविदाधारकांची माहितीच प्राप्त झाली नाही. तसेच काही निविदाधारकांनी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या इतर निविदा धारकांच्या प्रमाणपत्र तसेच कामाबाबत पालिकेला तक्रारी दिल्या. त्यामुळे निविदेची पुढील प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाला अडचणी येत असल्याने आता दुसरी निविदा ही पालिकेने रद्द केली आहे. तीन वर्षांसाठीच्या निविदेसाठी जवळपास दीड वर्षे निविदा प्रक्रिया राबविण्यातच गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता इतर महापालिकेच्या निविदांचा अभ्यास करून नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. आता निविदा प्रक्रियेतील सर्व बाबी तपासून नवीन निविदा काढली जाणार आहे. मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका

महिन्याला १७ कोटी ३३ लाखाचा खर्च

वसई विरार पालिका क्षेत्रातील रस्ते नियमित सफाई करणे, उघडी गटारे आणि बंदिस्त गटारावरील चेंबर्स साफ करणे तसेच वर्गीकृत, विलगीकृत कचरा संकलीत करून कचराभूमीवर वाहून नेणे या सर्व कामासाठी पालिकेला सध्या प्रत्येक महिन्याला १७ कोटी ३३ लाख २७ हजार ४६७ रुपये एवढा खर्च येत आहे. तर वर्षाला २०७ कोटी ९९ लाख २९ हजार ६०४ रुपये खर्च येत आहे. अनेक वर्षापासून एकाच पद्धतीने आणि एवढ्याच रकमेत काम करण्यात येत आहे. त्यामुळे नव्या ई निवेदेत फार मोठी वाढ कंत्राटदारांना अपेक्षित असली तरी, पालिका प्रशासन मात्र पालिकेचे पैसे वाचविण्याचे दृष्टीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी इतर महापालिकांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा अभ्यास करण्यात येत आहे.

घनकचरा व्यवस्थापनात घोटाळा झाल्याचा आरोप

घनकचरा व्यवस्थापनात घोटाळा झाल्याचा आरोप विविध स्तरातून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनकचरा व्यवस्थापनात २४ कोटी ६४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा प्रश्न आमदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केला होता. त्यांची शासनाने उच्चस्तरीय समिती नियुक्त करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात गोखिवरे येथील घनकचरा प्रकल्प उभारणीपासून (सन २०१०) ते आयआयटी, पवई, मुंबई या त्रिसदस्य संस्थेच्या परीक्षणानंतर ऑडिट रिपार्ट प्राप्त होईपर्यंतच्या (सन २०१७) कामाची चौकशी, घनकचरा प्रकल्प उभारण्यात आर्थिक गैरव्यवहार, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची देखभाल दुरूस्ती व प्रकल्प कशाप्रकारे चालवावा याबाबत आयआयटी मुंबई यांनी सुचविलेल्या बाबींची पूर्तता महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे किंवा नाही, व्यवस्थापनातील अनियमितता अशा प्रकारे ही चौकशी सुरू आहे.

शहरात घनकचरा व्यवस्थेचा बोजवारा

शहरात घनकचरा व्यवस्था असताना देखील ठिकठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापना बोजवारा उडाला असून आता शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहे.