वसई : वसई विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. एकूण ११५ जागांपैकी ५८ जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.विशेषत महिला आरक्षण आणि राखीव जागा यामुळे अनेक सर्वसाधारण गटातील इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. वसई विरार महापालिकेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. २८ जून २०२० मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका होणे अपेक्षित होते. मात्र करोनाच्या संकटामुळे निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे पालिकेवर प्रशासकाचे राज्य होते.

आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पालिकेने २०२५ ची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गव सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी आरक्षण सोडत विरार पश्चिम येथील महापालिकेच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर पार पडली.

२९ प्रभाग असून ११५ जागा आहेत.१ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार याद्यांच्या आधारे प्रभागनिहाय आरक्षण निश्चित केले असून ही सोडत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली.यावेळी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त स्वाती देशपांडे, अजित मुठे, अर्चना दिवे,सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यासह इतर अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

महापालिकेच्या ११५ जागांसाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. १७ ते २४ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. डॉ. इंदुराणी जाखड, प्रभारी आयुक्त महापालिका तथा जिल्हाधिकारी पालघर

असे आहे आरक्षण

११५ जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यापैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी प्रत्येकी पाच जागा तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ३१ जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर ५० टक्के राखीव जागेच्या नियमानुसार ११५ पैकी ५८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागांमध्ये राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत.

महिलांसाठीच्या आरक्षीत जागा

११५ पैकी ५८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी १४अ, ११अ, १९अ या जागा, अनुसूचित जमातीसाठी २५अ, १९ब, २७अ या जागा, ओबीसी प्रवर्गातील १२अ, २३अ, १ब, २०क, २१ब, ४अ, ७अ, ६अ, ९अ, २अ, १५अ, २६अ, १३अ, १७अ, ८अ आणि २९अ या जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १क, २ब, ३ब, ३क, ४ब, ५ब, ५क, ६ब, ७ब, ८ब, ९ब, १०ब, १०क, ११क, १२क, १३ब, १४क, १५ब, १६ब, १६क, १७ब, १८ब, १८क, २०ड, २१क, २२ब, २२क, २३क, २४ब, २४क, २५क, २६ब, २७क, २८ब, २८क, २९ब या जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण गटातील पुरुष उमेदवारांना धक्का

महिला आरक्षण व राखीव जागा यामुळे सर्वसाधारण गटातील पुरुष वर्गातील इच्छुक उमेदवारांना चांगलाच धक्का बसला आहे.२९ प्रभागापैकी १७ प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला एकच जागा असल्याचे आरक्षण सोडतीवरून स्पष्ट झाले आहे.या प्रभागांमध्ये प्रस्थापीतांची सोय होणार असून,अनेक नवोदितांना मात्र जागाच शिल्लक राहणार नसल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागांचा पर्याय शोधावा लागणार आहे. तर प्रभाग क्रमांक २० मध्ये सर्वसाधारण पुरुषाला जागाच नाही. यातील अ जागा अनुसूचित प्रवर्गासाठी आरक्षित असून, ब जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाली आहे . तर महिला आरक्षणाच्या सोडतीत या प्रभागातील उर्वरित दोन्ही जागा महिलांसाठी गेल्या आहेत. क जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला आणि ड जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे या प्रभागात सर्वसाधारण पुरुष उमेदवाराला एकही जागा शिल्लक नाही.परिणामी या प्रभागात तयारी केलेल्या सर्वसाधारण पुरुषांना आता उमेदवारीसाठी दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.