वसई: वसई विरार मध्ये असलेल्या बहुतांश तलावांची अवस्था फारच बिकट बनली आहे. त्यांचे योग्य रित्या संवर्धन व स्वच्छता होत नसल्याने ही तलाव आता प्रदूषित झाले असल्याचे दिसून येत आहे. आता अशा तलावांचे संवर्धन करण्यावर पालिकेने भर दिला असून पहिल्या टप्प्यात ९ तलाव नैसर्गिक रित्या संवर्धित केले जाणार आहे. तसा प्रस्तावही तयार करून जिल्हा नियोजन कडे पाठविण्यात आला आहे.
वसई विरार शहरात असलेली अनेक जुनी व ऐतिहासिक तसेच नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले तलाव आहे. शहरात शंभराहून अधिक तलाव असून यापूर्वी पालिकेने बहुतांश तलावाच्या ठिकाणी सुशोभित करून विकसित केले आहे. मात्र त्यानंतर त्या तलावांचे संवर्धन व स्वच्छता करण्याकडे पाठ फिरवली असल्याने शहरातील अनेक तलाव ही प्रदूषित झाली आहे.सद्यस्थितीत तलावात मोठ्या प्रमाणात कचरा, शेवाळ, गाळ ,जलपर्णी तयार झाली आहे. पालिकेकडून तलाव स्वच्छता न केल्याने त्या तलावातील पाणी प्रदूषित झाल्याचे चित्र आहे तर काही ठिकाणी तलावांतच सांडपाणी सोडून देण्याचे प्रकार घडतात यामुळे ही तलाव अस्तित्वात राहितील की नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता.
तसेच स्पार्क (सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ एरिया रिसोर्स सेंटर) या खासगी संस्थेच्या मार्फत नगररचनाकार अनिरुद्ध पॉल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत शहरातील तलावांची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात जवळपास १२८ तलाव प्रदूषित असल्याचे समोर आले होते. यासाठी पालिकेने जलस्त्रोत टिकविण्यासाठी त्यांचे संवर्धन होण्यासाठी ही तलावांचे संवर्धन करावे अशी मागणी सातत्याने नागरिकांमधून करण्यात येत होती.
अखेर पालिकेने पुन्हा एकदा शहरातील तलावांचे नैसर्गिक रित्या संवर्धन व्हावे यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिका तलावांचे पुनरुज्जीवन करून त्याचे टप्प्याटप्प्याने विकसित करणार आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने नऊ तलावांची निवड केली आहे. यात आचोळे, टोटाळे, वालीव, राम मंदिर, गोखीवरे, चकरेश्वर, रानाळे, गास, माणिकपूर अशा नऊ तलावांचा समावेश करण्यात आला आहे.
यासाठी एक एजन्सी नियुक्त करून तलावांचे नैसर्गिक रित्या संवर्धन केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.
तलाव नितळ व स्वच्छ कसे राहतील असा पालिकेचा मानस आहे यासाठी अर्थसंकल्पात तलाव संवर्धनासाठी विशिष्ट निधीची तरतुद केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव
वसई विरार महापालिकेने पहिल्या टप्प्यात निवडलेल्या तलावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ती तलावं किती जागेत विस्तारली आहेत याचा आढावा घेऊन तसा प्रस्ताव तयार करून पालिकेने जिल्हा नियोजन कडे पाठविला असल्याचे उपायुक्त ( तलाव व उद्यान) समीर भूमकर यांनी सांगितले आहे.
तलावाचे नाव व तलाव क्षेत्र
आचोळे – ७.२ एकर
टोटाळे – ३ एकर
वालीव – ३ एकर
चकरेश्वर- ४ एकर
रानाळे – २ एकर
गोखीवरे- ,१.२५ एकर
गास – ०.८ एकर
माणिकपूर – ४ एकर
एकूण – २८.२५ एकर क्षेत्र
नैसर्गिक पणा जोपासणे आवश्यक
शहरात वाढत्या काँक्रिटीकरणामुळे भूजल पातळीत घट होत आहे. ती पातळी टिकविण्यासाठी जे नैसर्गिक तलाव व बावखळ यासारखे जलस्त्रोत आहेत त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यांचे संवर्धन सुशोभीकरण करण्यासाठी काँक्रिट न वापरता ते नैसर्गिक रित्या करावे असे पर्यावरण प्रेमीं व पाणी अभ्यासकांनी सांगितले आहे.
अर्थसंकल्पात २७ कोटींची तरतूद
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागातील तलाव प्रदूषित असल्याचे दिसून येत आहे. या तलावांचे संवर्धन करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने २७ कोटींची तरतूद केली आहे.यातून तलाव स्वच्छता कार्यक्रम हाती घेऊन त्यांचे संवर्धन केले जाणार आहे.