विरार : शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही मुख्य रस्त्यांवरील पाणी अजूनही ओसरलेले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही वसई- विरारकरांना पाण्याचा सामना करत धोकायदायक ट्रॅक्टरवारी करावी लागली.

वसई विरार शहरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पालिकेची परिवहन सेवा बंद करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशीही पाणी ओसरले नसल्याने अजूनही काही ठिकाणी दोन तीन फूट पाणी रस्त्यांवर साचलेले आहे. लोकांना पाण्यातून प्रवास करण्यासाठी मंगळवारी खाजगी ट्रॅक्टर सेवा  सुरू करण्यात आली होती. मात्र पाण्याची स्थिती बदलेली नसल्याने बुधवारीही ट्रॅक्टर सुरूच होते. शहरातील ट्रॅक्टरची आणि प्रवाशांची संख्या काही प्रमाणात वाढलेली दिसून आली. यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणारी ट्रॅक्टर्स दिसत होती. शहरात वाहतुकीचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नोकरीसाठी म्हणून असा धोकादायक प्रवास करावा लागत आहे असे बोळींज येथील रहिवासी सोहम पाटील यांनी सांगितले.

नागरिकांच्या खिशाला कात्री

ट्रॅक्टर चालकांकडून प्रति व्यक्ती ३० ते ५० रुपये आकारले जातात. त्यामुळे सध्या प्रवाशांना जाऊन येऊन असे शंभर रुपये मोजावे लागत आहेत. तसेच ही सेवा  खारोडी ते विरार रेल्वे स्थानक अशीच असल्यामुळे बोळींजपासून पुढे जाण्यासाठी वेगळा खर्च करावा लागत आहे. तसेच अवघ्या दोन ते दोन किलोमीटर रस्त्यासाठी ट्रॅक्टर चालक पन्नास रुपये घेत असल्याने सर्वसामान्यांची एक प्रकारची लूट असल्याचे गोखीवरे येथील प्रशांत भोईर यांनी सांगितले आहे.

नागरिकांची पायपीट

 विरार पश्चिमेच्या ओलांडा ते पुरापाडा तसेच परांजपे नगर ते नंदाखाल अशा रस्त्यांवर तसेच विरार आगाशी मुख्य रस्त्यांवर पाणी साचलेले असल्याने नागरिकांना विरार स्थानकात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तर वसईच्या विविध ठिकाणच्या रस्त्यावरही हीच स्थिती होती.

ठिकठिकाणी नाक्यात नागरिक ट्रॅक्टरची वाट पाहत गर्दी करून उभे असल्याचे दिसून आले तर नोकरी निमित्त बाहेर पडलेल्या बहुतांश नागरिकांना मोठी पायपीटच करावी लागली.

रुग्णसेवेवरी परिणाम

शहर जलमय झाल्याचा परिणाम रुग्यसेवेवरही झाल्याचे दिसून आले. विरार पश्चिमेला काही रुग्णवाहिका पाण्यातच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे रुग्णालयात उपचारांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरचाच आधार घ्यावा लागला. काही ठिकणी पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून रुग्णांना सुरक्षितपणे रुग्णालयात सोडण्यात येत असल्याने रुग्णांची सोय झाली होती.