वसई:वसई विरार शहरात रिक्षा चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. नुकताच रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला आचोळे पोलिसांनी अटक केली आहे. या अटक आरोपींकडून चोरी केलेल्या चार रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
वसई विरार शहराच्या विविध ठिकाणच्या भागातून सातत्याने वाहन चोरी होण्याच्या घटना समोर येत असतात. नुकताच नालासोपारा पूर्वेच्या आचोळे गाव परीसरात राहणारे जितेश ठाकूरदीन गौंड या रिक्षा चालकाची रिक्षा चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार विरार पूर्वेच्या कुंभार पाडा येथून या आरोपीला अटक केली आहे.
प्रकाश पुकराज त्रिवेदी (३३) असे या आरोपीचे नाव त्यांच्या कडून चोरी केलेल्या १ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ २ पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक मंगेश वडणे, गुरुदास मोरे, दत्तात्रय दाईंगडे,शंकर शिंदे, निखील चव्हाण, विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर,गोविंद गुट्टे, लोकेश कुवर, सुशांत भोये, अमोल बरडे आदींच्या पथकाने केली आहे.
अन्य पोलीस ठाण्यात ही गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला आरोपी प्रकाश पुकराज त्रिवेदी (३३) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने अन्य ठिकाणी ही वाहने चोरी केली आहे. त्यावर विरार पोलीस ठाण्यात ४, वालीव १, नयानगर १ आणि काशीमिरा २ असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नालासोपाऱ्यात यापूर्वीही सराईत रिक्षाचोराला अटक
यापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालासोपारा पूर्व, आंबेडकर नगर, टाकी रोड येथून रिक्षाचोरीला गेल्याची घटना घडली होती. गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने तपास करत संजय लालमन यादव या आरोपीला अटक केली. आरोपीकडुन नालासोपारा पुर्व, भाईंदर पुर्व, दहिसर पूर्व परिसरातुन चोरलेल्या एकुण ३ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या होत्या. तर त्याच्यावर तुळींज, माणिकपूर, नवघर, विरार, दहिसर, नालासोपारा या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची बाबही समोर आली.होती.
