वसई: मागील तीन दिवसांपासून वसई विरार शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.सोमवारी सुद्धा पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. तर काही ठिकाणच्या गृहसंकुलात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळपासून आतापर्यंत ६६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारपासून वसई विरार शहरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रविवारी सायंकाळी थोड्याफार प्रमाणात उसंत दिली होती. मात्र सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा शहर जलमय झाले.
यावेळी विरार येथील विवा महाविद्यालय परिसर, साईनाथ नगर, पुष्पानगर, बोळींज, ग्लोबल सिटी,नंदाखाल, दोन तलाव -वटार रस्ता यासह नालासोपारा येथील अलकापुरी, गाला नगर, गास रस्ता, संकेश्वर नगर आणि रेल्वे स्थानक परिसरांत पाणी साचले. तसेच, वसईतील सागर शेत, गिरीज रस्ता माणिकपूर, वसई गाव, बंगली नाका, देवतलाव आणि नायगाव पूर्वेकडील स्टार सिटी, रिलायबल, सनटेक यासह इतर ठिकाणी पाणी साचले.अशा साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालक व नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिल्याच दिवस असल्याने कामावर निघालेले चाकरमान्यांचे ही चांगलेच हाल झाले आहेत. याशिवाय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही या पावसाचा फटका बसला. पाऊस सुरू असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. पाणी उपसा करण्यासाठी पालिकेने काही ठिकाणी सक्शन पंप लावले होते. मात्र तेही आता अपुरे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गृहसंकुलात पाणीच पाणी
सलग तीन दिवस पाऊस सुरू असल्याने शहरातील गृहसंकुलात ही पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या सामानाची उचल ठेव करावी लागली आहे. विरारच्या यशवंत पार्क मध्ये ही पाणी साचले आहे. मी मागील दहा ते पंधरा वर्षापासून राहत आहे. येथे पाणी साचण्याची समस्या आहे तरी सुद्धा पालिका यावर उपाययोजना करीत नाही असे नागरिक योगेश खैरे यांनी सांगितले आहे. युनिटेक गृहसंकुला तीन दिवसांपासून पाणी शिरले आहे. या पाण्यात माझ्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी साचल्याने आम्हाला टेरेस वर जाऊन राहावे लागत आहे असे गणेशराव बहुरूपी यांनी सांगितले आहे.
वसई तालुक्याची पावसाची आकडेवारी
आगाशी मंडळ – ३९.०० मि. मि
निर्मळ मंडळ – ४०.०० मि. मि.
माणिकपूर मंडळ- ७४.00 मि. मि.
वसई मंडळ- ६७.०० मि. मि.
विरार मंडळ- ६५.०० मि. मि.
कामन मंडळ- ६९.०० मि. मि.
बोळींज मंडळ- ३३.०० मि. मि
मांडवी मंडळ- १०६.०० मि. मि
पेल्हार मंडळ- १०६.०० मि. मि
एकूण – ५९९ मि. मि
एकूण सरासरी- ६६.५५ मि.मि