वसई : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वसई-विरार शहराला चांगलाच फटका बसला आहे. सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. याचा परिणाम वसई विरार महापालिकेच्या बससेवेवर झाला होता. त्यामुळे बहुतेक भागातील बस सेवा ही अर्धा ते एक तास उशिराने येत होत्या.
गेल्या तीन दिवसांपासून वसई विरार शहरात पावसाने पुन्हा जोर धरायला सुरुवात केली आहे. सोमवार सकाळपासून शहरात पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. तर काही ठिकाणी गृहसंकुल, दुकानांमध्येही पाणी शिरू लागले आहे. पावसाचा वाढता जोर पाहता नागरिकांनी घरची वाट धरायला सुरुवात केली आहे. पण, मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली असल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.
वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक महापालिकेच्या बससेवेचा वापर करतात. तसेच वाढत्या पावसामुळे शाळेतून लवकर सुटणारे विद्यार्थी, तसेच कामावरून लवकर घरी परतणारे नागरिक यांनी बसस्थानकांवर मोठी गर्दी केली होती. पण,आज नेहमीपेक्षा उशिराने शहरात बस धावत असल्याने बस डेपो तसेच रेल्वे स्थानकातूनच बसेस गर्दीने तुडुंब भरत होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी बसची तास दीड तासभर वाट पाहूनही प्रवाशांना बसमध्ये चढता आले नाही. तर काही ठिकाणी काही ठिकाणी तर गर्दीमुळे बसचालकांनी थांबाच घेतला नाही.
मुसळधार पावसामुळे रेल्वे वैगरे बंद होईल म्हणून मी आज लवकर आले. पण गेला पाऊण तास उभं राहूनसुद्धा बस आली नसल्याची प्रतिक्रिया सोनल यादव यांनी दिली. तर, बस वेळेत येत नसल्यामुळे बस कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली पण त्यांनाही बसची नेमकी वेळ माहित नसल्याने शेवटी रिक्षाने घरी जावे लागत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले.
खड्डेमय रस्त्यांमुळे बसला उशीर
वसई विरार भागात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्यत्वे वसई पूर्वेतील चिंचोटी, वालिव, रेंज ऑफिस या भागातील रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरून गाडी चालवणं कठीण होऊन बसलं आहे. आणि त्यामुळे बसेस बस थांब्यांवर उशिरा पोहोचत असल्याची प्रतिक्रिया बसचालकांनी दिली.