वसई – मागील आठ ते दहा वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (RTO) चा प्रश्न मार्गी लागला आहे. या रखडलेल्या नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामाला आता गती मिळाली आहे. आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण केले असून येत्या जून २०२६ पर्यँत याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे वसई विरार करांना लवकरच प्रादेशिक परिवहन कार्यालय उपलब्ध होणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सध्या स्थितीत विरारच्या चंदनसार (भाटपाडा) येथे भाड्याच्या जागेत सुरू आहे. अपुरी जागा, धोकादायक अवस्थेत असलेली इमारत, सोयी सुविधांचा अभाव अशा अनेक अडचणी या कार्यालयात जाणवत आहेत. यासाठी आता वसई पूर्वेच्या गोखीवरे येथील सर्व्हे क्रमांक २३३/अ/१ व ४ या ३.३ हेक्टर जागेत पालघर जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यात येत आहे.
कार्यालयाच्या बांधकामांची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.

उभारण्यात येत असलेल्या कार्यालयाची इमारत दोन मजली असून त्यात २५ हजार चौरस फुटांवर बांधकाम केले जात आहे. आरसीसी संकल्पनाची कन्सल्टंट कडून तपासणी, १२ मीटर लांबीचा पोहच रस्ता, यासह इतर तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी १३.९२ कोटी रुपये इतका निधी खर्च केला जात असून आतापर्यंत जवळपास आरसीसी कॉलम उभारणी सह दोन स्लॅबचे काम पूर्ण केले आहे. याशिवाय आतील भिंतीचे काम ही सुरू करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

आतापर्यंत जवळपास आम्ही या कार्यालयाच्या इमारतींचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या जून महिन्या पर्यंत हे कार्यालयाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय यादव यांनी सांगितले आहे.

१२ मीटर पोहच रस्ता पालिकेकडून

नवीन उभ्या राहत असलेल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने सुरवातीला अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता त्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असल्याने हा १२ मीटर रस्ता पालिका विकसित करून देणार आहे. त्यासाठी सुमारे २ कोटी ९३ लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे.

विद्युत कामासाठी नवीन आराखडा

प्रादेशिक कार्यालयाचे बांधकाम सुरू झाले आहे. असे जरी असले तरी कार्यालयात लावण्यात येत असलेली विद्युत उपकरणे व अन्य विद्युत कामासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे. मात्र अजूनही तो मंजूर झाला नसल्याने त्या अडचणी कायम आहेत. नवीन कार्यालय तयार व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

परिवहन कार्यालयाचे काम सुरूच आहे. ज्या अडचणी होत्या दूर केल्या आहेत. वेळोवेळी सुरू असलेल्या कामाचा आढावा आम्ही घेत आहोत. लवकरच हे काम पूर्ण करून आम्ही परिवहन विभागाला सुपूर्द करू – संजय यादव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वसई.

नागरिकांच्या अडचणी दूर होतील

विरारच्या चंदनसार येथे परिवहन कार्यालय आहे. या कार्यालयात ये जा करण्यासाठी नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. दररोज या ठिकाणी  वाहने नोंदणी, परवाना, बॅच, पासिंग, यासह विविध कामासाठी येतात. कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर अपुरी जागा यासह विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी हे कार्यालय आता तालुक्याच्या मध्यवर्ती भागात होईल त्यामुळे विरार आणि वसई दोन्ही भागातील नागरिकांना ये जा करण्यास सोपे होईल. याशिवाय तेथे आल्यानंतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.