वसई: वसई विरार महापालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी स्मार्ट ई शौचालय उभारण्यात आले होते. मात्र, या शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे शौचालयांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे लाखों रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
वसई विरार महापालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी नऊ प्रभागात नऊ स्मार्ट ई शौचालय उभारण्यात आले होते. यासाठी ९० लाख रुपये इतका निधी खर्च केला होता. तर या शौचालयांच्या देखभालीसाठी ठेकेदारांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली होती. मात्र संबंधित ठेकेदारांनी ई शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या शौचालयांची अवस्था बिकट बनली आहे.
विरार पूर्वेकडील कोपरी, साईनाथ, वसई पश्चिमेतील अंबाडी मार्ग तसेच अन्य भागात बांधण्यात आलेल्या शौचालयांचीही दुरावस्था झाली आहे. शहराच्या काही भागातील ई शौचालय नाहीसे झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर उरलेले शौचालय हे गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. या ई शौचालयांच्या दाराला लागलेला गंज, तुटलेल्या कड्या यामुळे भटके श्वान, चरसी, गर्दुल्ले आता या शौचालयांचा वापर करू लागले आहेत. त्या शौचालयांची पाहणी करून त्यावर उपाययोजना केल्या जातील असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
नागरिकांची गैरसोय
रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या शौचालयाचा फायदा होईल या उद्देशाने ते तयार करण्यात आले होते. पण, देखभालीअभावी शौचालयात घाणीचे साम्राज्य तयार झाल्यामुळे नागरिकांना या शौचालयांचा वापर करणे कठीण होऊन बसले आहे. तर, शौचालयातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेसुद्धा मुश्किल होऊन बसले आहे.
