वसई: वसई विरारच्या पश्चिम पट्ट्तील विद्यार्थ्यांना अपुऱ्या बससेवेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अर्नाळा ते वसई मार्गांवर अतिरिक्त एसटी बसच्या फेऱ्या सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वसई विरारच्या पश्चिम भागात अनेक शैक्षणिक संस्था असून या परिसरात विद्यार्थी मोठया संख्येने शिक्षण घेण्यासाठी म्हणून अर्नाळा ते वसई मार्गांवर प्रवास करत असतात. मात्र एसटी बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमध्ये आणि महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. भुईगाव, गास, निर्मळ, नाळा, नंदाखाल, आगाशी, वाघोली, नवाळे, कळंब, राजोडी, उमराळे-करमाळे, सत्पाळा आणि अर्नाळा या परिसरातून मोठया संख्येने विद्यार्थी प्रवास करत असतात.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नालासोपारा व अर्नाळा आगारातून अतिरिक्त एस.टी. बसेस सुरू करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. परिवहन महामंडळाच्या पालघर विभागीय नियंत्रक तसेच नालासोपारा व अर्नाळा आगार व्यवस्थापकांकडे लेखी निवेदन देऊन अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार बस सेवा वाढविण्यात येतील असे अर्नाळा एसटी आगारातून सांगण्यात आले आहे.