वसई : वसई पश्चिमेत गटाराचा स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असतानाच, आता अगरवाल परिसरातील गटारावरील स्लॅबही एका बाजूने खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यालगत असलेल्या या वर्दळीच्या भागात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक ये-जा करतात. त्यामुळे, महापालिकेने या स्लॅबची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

वसई पश्चिम भागातील अगरवाल परिसरातील मॅक्डोनल्ड्सलगत असलेल्या गटाराचा स्लॅब एका बाजूने खचला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खचलेला हा स्लॅब मुख्य रस्त्याच्या अगदी शेजारी असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ असते. विशेषतः, स्लॅबच्या शेजारी मॅक्डोनल्ड्ससह, दागिन्यांची दुकाने, एटीएम आणि व्यायामशाळा आहेत. तसेच, स्लॅबवर आणि त्याला लागून खाद्यपदार्थांचे इतर लहान-मोठे स्टॉल आहेत. परिणामी, या स्लॅबवरून ये-जा करण्यासाठी अनेकदा पुरेशी जागा नसते आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन त्याच खचलेल्या स्लॅबवरून चालावे लागते.

भर पावसात हा स्लॅब खचल्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, महापालिकेने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, या स्लॅबचे तात्काळ लेखापरीक्षण (ऑडिट) करावे आणि लवकरात लवकर तो दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अगरवाल परिसरातील खचलेल्या स्लॅबची पाहणी करून यावर अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर यासंबंधी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई गावात स्लॅब कोसळल्याची घटना

यापूर्वी, १० जुलै रोजी वसई तहसील कार्यालयाशेजारील गटाराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संततधार सुरू असलेल्या पावसामुळे हा स्लॅब कमकुवत झाला होता. त्यावर गवत उगवले होते आणि १० जुलै रोजी सकाळी तो कोसळला. या घटनेनेही नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.